सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नजिकच्या काळात होणारा गणेशोत्सव लक्षात घेता वीज वितरण मधील अडी-अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण संबंधीत आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आवश्यक आहे. त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात यावा. यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. वाहनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. गणपतीपूर्वी वीज देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत. ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे,अशा ठिकाणी जादा प्रमाणात लोखंडी पोल देण्यात येऊन विद्युतीकरणाची कामे सुरु करावीत. सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता वीज वितरण अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सुचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलताना केल्या.
लोकांचा वावर ज्या-ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आपत्ती व्यवस्थापनातूनही खर्च देण्यात येईल. तसेच ज्या-ज्या शाळेच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत अशी ठिकाणे शोधून सदरचे ट्रान्सफॉर्मर शाळेकडून अन्य ठिकाणी हलविण्यात यावेत, शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात यावी. यावेळी आमदार वैभव नाईक,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, मालवण नगरपालिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, चंद्रशेखर पाटील व अन्य कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, वीजग्राहक उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी वीज वितरणाबाबतच्या समस्या मांडल्या. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना ओव्हर टाईम मिळावा. काम करण्यासाठी लागणारे सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावे, फळबागायतीचे वीज वितरणामुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी अशा अडचणी येथे मांडण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उपअभियंता यांनी काम करत असताना येणाऱ्या अडचणी विषद केल्या.
जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, गणपतीमध्ये येथील लोकसंख्या दीडपटीने होत असल्याने सर्वांनीच गणपतीपूर्वी वीज वितरण सुरळीत होण्यासाठी काम करायचे आहे. ज्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता आहे ती झाडे तोडण्याची कामे ताबडतोब पूर्ण करण्यात यावीत.
प्रारंभी महावितरणचे आंबेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच प्रास्ताविक चंद्रशेखर पाटील यांनी केले.