रत्नागिरी, (आरकेजी) : अंगावर वीज पडून चौदा वर्षाचा मुलगा मरण पावल्याची घटना खेड तालुक्यातील ऐनवली गावात घडली. आदित्य अशोक मोरे असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
अचानक वीजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. याचवेळी आदित्य हा त्याच्या घरी होता. घराच्या खिडकीतून वीज त्याच्या घरात शिरली आणि अंगावर पडली. या धक्क्याने आदित्य बेशुद्ध पडला.
त्याला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. आज आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.