मुंबई, (निसार अली) : मालाड पूर्व येथील वाघेश्वरी मंदिर, आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा आदी परिसरातील नागरिक वीजेची जोडणी मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. घरात वीज यावी, यासाठी येथील नागरिक अनेक वर्षांपासून संबंधीत प्रशासनाशी पत्रव्यवहारही करत आहे. तरिही प्रतिसाद मिळालेला नव्हता. म्हणूनच लोकशाही मार्गाने आपला लढा लढण्याचे नागरिकांनी ठरविले आणि रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर सामाजीक कार्यकर्ते वैभव भराड़कर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच भव्य मोर्चा काढला. एक हजार जण यात सहभागी झाले होते.
मोर्चाच्या शिष्ट मंडळाने रिलायन्स एनर्जीच्या अधिकार्यांशी चर्चा केली. विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. पावसाचे दिवस असल्याने वीज जोडणी लवकरात लवकर देण्यात यावी, परिसरात झाडीझुडपी वाढल्याने सर्पांचा वाव वाढला. वीजे अभावी अंधार होत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. रिलायन्स एनर्जीचे अधिकारी आशीष खेड़ेकर यांनी शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.