नागपूर : पैनगंगा नदीवरील ११ बॅरेज उभारणीचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या बॅरेज परिसरातील कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी आवश्यक असलेला ९५ कोटी रुपये निधी जलसंपदा विभागाने तातडीने महावितरणला उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बॅरेज परिसरातील वीज जोडण्यांसाठी महावितरणने ९५ कोटी ८० लक्ष रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने तत्काळ महावितरणला निधी उपलब्ध करून द्यावा. निधी प्राप्त होताच महावितरणने वीज जोडण्या देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत वीज जोडण्याचे कामे रखडता कामा नये. जिल्ह्यातील सर्व प्रलंबित वीज जोडण्या देण्याची कार्यवाही गतिमान करावी. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी महावितरणला दिल्या. जिल्ह्यात सौर कृषिपंपांना शेतकऱ्यांची मागणी आहे,त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. याकरिता केंद्र शासनाचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वाशिम शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील सावरगाव जिरे गावाला जोडणारा रस्ता वन विभागाच्या परवानगी अभावी रखडला आहे. याविषयीच्या आवश्यक परवानग्या वन विभागाने तातडीने देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जून २०१९ पर्यंत वाशिम जिल्ह्यात ७०० किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. हे रस्ते दर्जेदार होतील, याची दक्षता घ्या. तसेच शासनाच्या हायब्रीड अन्युटी योजनेंतर्गत रस्त्यांचे कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने भूसंपादनाची कार्यवाही सुरु आहे. त्याला अधिक गती देऊन डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादनाचे ५० टक्के काम पूर्ण करावे, भूसंपादन प्रकरणात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, सूचनाही त्यांनी केल्या.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला गती द्या
सन २०१९ पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला स्वतःच्या मालकीचे घर देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नागरी क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला गती द्या. नागरी भागासाठी आवश्यक असलेल्या घरांचे नियोजन करून त्याचे डीपीआर तातडीने मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील बेघरांसाठी राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनांचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला.
यावेळी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय धोत्रे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक,मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.