रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीत मान्सून पूर्व पावसाने पहिला बळी घेतला. अंगावर वीज पडल्याने हातखंबा तारवेवाडी येथील एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंकज घवाळी असं या मृत तरुणाचं नाव आहे.
विजांच्या कडकडाटासह आज दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरीच्या अनेक भागांत हजेरी लावली. दरम्यान साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास हातखंबा तारवेवाडी येथील पंकज घवाळी गोठ्याच्या बाहेर उभा होता. यावेळी विजांचा लपंडाव आकाशात सुरु होता, याचवेळी गोठ्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या पंकजच्या अंगावर वीज कोसळली. आणि क्षणात तो खाली कोसळला. निवळी येथील व्यापारी भाई जठार यांनी पंकजला उपचारासाठी तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलविले, मात्र विजेचा झटका इतका तीव्र होता की, या तीव्र धक्क्यातच पंकजची प्राणज्योत मालवली.
दरम्यान विजेच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरातील वायरिंग देखील जळून खाक झाली आहे.