मुंबई, 26 जून : दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रमाणे, महाराष्ट्रात कोरोना महामारी दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेचे मार्च ते जून २०२० या चार महिन्यांचे प्रत्येकी २०० युनिट प्रतीमहीना इतके विजबिल माफ करावे या मागणीसाठी आज आम आदमी पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. मुंबईत अदानी इलेक्ट्रिकच्या कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.
आम आदमी कडून राज्यभर ३ जूनला राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही वीज बिल माफी बाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आजचे आंदोलन होते. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनानंतर वीजबिल माफीसंबंधीच्या खालील मागणीचे निवेदन स्थानिक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दिले आहे.
एकीकडे जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे वीजबिल माफीची मागणी होत. असतांना MSEB कडून दर वाढवून भरमसाठ वीज देयक पाठविणे हे जनतेची मानसिक आणि आर्थिक पीळवणूक आहे. सरकार हे जनतेचे माय-बाप असते, आणि जेंव्हा राज्यातील जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झाली आहे, अशा वेळी त्यांना विजेचे दर वाढवून भरमसाठ वीज देयके पाठविणे म्हणजे MSEB ची सावकारी वृत्ती स्पष्टपणे दिसून येते आहे असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.
मुख्य मागण्या
१. कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा करावी,
२. MSEB कडून एप्रिल पासून वीज दरात करण्यात आलेली वाढ मागे घ्यावी,
३. कोविड दरम्यानचे MSEB कडून दिलेले भरमसाठ वीजबिल मागे घेवून
मागीलवर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीप्रमाणे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश,
४. राज्य सरकार चा 16% अधिभार रद्द करण्यात यावा.