रत्नागिरी (आरकेजी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2017-18 मधून जिल्ह्यात 74 लाभार्थिंना विहीर मंजूर झाली आहे. यासाठी 2 कोटी 85 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, 14 विहिरींचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यांनी यांनी दिली आहे.
अनुसुचित जाती-नवबौद्ध शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत नवीन विहीर बांधण्यासाठी रु. 2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती, रु. 50 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, रु. 1 लाख, वीज जोडणी आकार, रु. हजार, पंपसंच, रु. 25 हजार, इनवेल बोअरिंग, रु. 20 हजार, सूक्ष्मसिंचन-तुषार संच, रु. 25 हजार, ठिबक संच, रु. 25 हजार एवढे अनुदान देण्यात येते. हे अनुदान दोन टप्प्यात देण्यात येते. पहिला टप्प्यातील अनुदान विहिरीची खोदाई झाल्यावर तर दुसर्या टप्प्यातील अनुदान विहीरीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर देण्यात येते. या योजनेतंर्गत सन 2017-18 मध्ये 92 जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यापैकी 89 जणांनी विहीरीची मागणी केली होती. त्यातील 74 जणांनी योजनेचा लाभ घेत विहीर बांधली. यामध्ये मंडणगडमधील 7, दापोली 13, खेड 8, चिपळूण 5, गुहागर 11, संगमेश्वर 7, रत्नागिरी 11, लांजा 10 आणि राजापुरातील 2 लाभार्थिंचा समावेश आहे.यापैकी 14 जणांचे काम पूर्ण झाले आहे. 68 लाभार्थ्यांचे काम सुरू असून, मजूर वेळेवर उपलब्ध न झाल्याने विहिरींचे काम रखडले आहे. तर 7 लाभार्थ्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नाही.
लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्यात आले असून, विहिरीचे बांधकाम पूर्ण होताच पूर्ण अनुदान देण्यात येणार आहे. विहिर बांधून झाल्यावर सूक्ष्मसिंचन पद्धतीने शेतात पाणी पुरवठा केल्यास यासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात 39 जणांचे पंपसंच, 84 जणांचे वीज जोडणी, 29 जणांचे सुक्ष्म सिंचन संच तर दोघांचे शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.