मुंबई : विद्युत सुरक्षा सप्ताहाला उद्या ११ जानेवारीपासून सुरूवात होत असून या सप्ताहाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. विद्युत निरीक्षणालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहानिमित्त संपूर्ण राज्यभर ११ ते १७ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे.
सुरक्षा सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम उद्या १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, आमदार ॲड. राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित उपस्थित राहणार आहेत.
विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान राज्यात विविध शाळांमध्ये विद्युत सुरक्षासंबंधी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन परिसरात, सुरक्षेचे स्टॉल लावण्यात येतील. मागील वर्षात शून्य अपघात केलेल्या कर्मचारी व अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र व देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी शिवाजी पार्क ते भांडुप पश्चिम दरम्यान सुरक्षा संदेश देणारी रॅली काढण्यात येईल. वीज क्षेत्रातील कार्यरत कंपन्याकडून या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे.या विदयुत सुरक्षा सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम नांदेड येथे १७ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार असल्याचे विद्युत निरीक्षक सु.रा.बागडे यांनी कळवले आहे.