डोंबिवली, (प्रशांत जोशी) : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, कुतुहुलबुध्दी जागृत व्हावी या उददेशाने 5 व 6 जानेवारी रोजी येथील स.वा. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात पहिले विभागीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले असून याचे उदघाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
मंगळवारी येथील स. वा. जोशी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वरील माहिती जनरल एज्येकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी दिली. यावेळी दा. कृ. सोमण, उपाध्यक्ष शैलेंद्र साळवी, कार्यवाह किरण फडे, नामदेव मांडके आदि पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. कोल्हटकर पुढे म्हणाले, डोंबिवलीत यापूर्वी विभागीय साहित्य संमेलन, नाटसंमेलन व अ.भा. साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे याची आठवण त्यानी दिली. ते पुढे म्हणाले, हे संमेलन जनरल एज्युकेशन संस्था, मराठी विज्ञान परिषद, कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आहेत. येाग, आयुर्वेद, निसर्गोपचार, पर्यावरण, जीवनशैली हा विज्ञान संमेलनाचा केंद्रबिंदु असून विज्ञानाची रुची विद्यार्थ्यामध्ये वाढावी व ठाणे जिल्हातील विविध शाळातील विद्यार्थ्याच्या 100 नाविन्यपूर्ण व कल्पक प्रयोगांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी लॅब विविध दालनांमध्ये नेहरु सायन्स सेंटरच्या मदतीने द्रवरुप नायट्रोजन व अन्य प्रयोगदर्शन हे पण संमेलनाचे वैशिष्ठ असणार आहे असेही त्यानी सांगीतले. संमेलनापूर्वी 3 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता स.वा. जोशी विद्यालयापासून ‘विज्ञान दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8976592465 या भमानध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.