नागपूर : संरक्षण क्षेत्रातील उद्योग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या क्षेत्रात गुंतवणूकीला सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल सेंटर पॉईंट येथे विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या ‘मेड इन विदर्भ इन डिफेन्स एन्ड एरोस्पेस शिखर परिषदेत’ श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल रविंद्र थोडगे, स्लोव्हाकियाच्या युडीएस कंपनीचे अध्यक्ष थॉमस मॅरोस, टाटा टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आनंद भदे,भारत अर्थ मुव्हर्स लिमीटेडचे वित्तीय संचालक सुरेश प्रकाश, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेडचे व्यवस्थापकीय अध्यक्ष दिनेश बत्रा, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमीटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नवाल उपस्थित होते.आगामी काळात संरक्षण क्षेत्रात उद्योगासाठी मोठी संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्यनारायण नवाल हे या क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्व आहे. एरोस्पेस उद्योग वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेसोबतच रोजगाराची नवी दालने युवकांसाठी खुली होत आहे, ही बाब निश्चित सुखावणारी आहे. संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग क्षेत्र वाढण्यासाठी विदर्भात मोठ्या संधी आहेत. मिहानमध्ये रिलायन्सचे एरोस्पेस निर्मिती कारखाना सुरु करत आहेत. केवळ एअर क्रॉफ्टचे सुटे भाग विदर्भात तयार होण्यापेक्षा संपूर्ण एअर क्रॉफ्ट येथे तयार होण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.संरक्षण क्षेत्र हे केवळ तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार नाही तर विदर्भातील लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र वाढण्यासाठी मोठी संधी निर्माण करेल. कौशल्यपूर्ण मानव संसाधन असणाऱ्या ठिकाणी उद्योग क्षेत्राची वाढ होते. आज झालेल्या सामंजस्य करारातून उत्कृष्ट मानव संसाधन तयार होईल. रोजगार वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करून यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व मदत आणि सहकार्य करण्यासाठी तयार आहे, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विदर्भ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य होण्यासाठी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनने केलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या पुढाकारामुळे विदर्भाची वाटचाल निश्चितच प्रगतीकडे होईल.तत्पूर्वी संबंधित उद्योगाच्या आवश्यक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी स्लोव्हाकियाच्या युडीएस कंपनी, इंडो स्लोव्हा चेंबर ऑफ कॉमर्स, टाटा टेक्नॉलॉजी तसेच महाराष्ट्र शासन आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सामंजस्य करार करण्यात आले. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.विदर्भ आणि नागपूरला संरक्षण आणि एरोस्पेसमध्ये लागणाऱ्या संसाधनाचा पुरवठा करणारे हब तयार करण्याच्या उद्देशाने विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन काम करीत आहे. यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ‘उडाण’ आणि ‘निर्माण’ हे प्रकल्प राबविण्यात येतील. यामध्ये विदर्भातील तंत्रनिकेतन आणि आयटीआय झालेल्या सुमारे 50 हजार तरुणांना पुढील पाच वर्षात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लघु व मध्यम उद्योगांना सर्व प्रकारच्या तपासण्या,गुणवत्ता चाचणी, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर निर्मितीसाठी सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील उद्योगांना संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी विहित प्रक्रियेची माहिती देणे आणि निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संरक्षण खरेदी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील उद्योगांना यासंबंधीचे ज्ञान कौशल्य आणि संसाधनांची निर्मिती करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती रविंद्र थोडगे यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन माजी मेजर जनरल अनिल बाम यांनी तर आभार विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे दुष्यंत देशपांडे यांनी मानले. यावेळी विदर्भातील उद्योजक,गुंतवणूकदार उपस्थित होते.