मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारी (दि. २४ जुलै) `वंदे मातरम`ने प्रारंभ झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार व इतर विधानसभा सदस्य उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षांची तालिका जाहीरराज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारी प्रारंभ झाला. या अधिवेशन कालावधीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभाध्यक्षांची तालिका जाहीर केली असून यामध्ये विधानसभा सदस्य योगेश सागर, सुधाकर देशमुख, सुभाष साबणे, श्रीमती निर्मला गावीत आणि पांडुरंग बरोरा यांचा समावेश आहे.
विधानसभेत दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी विधानसभा सदस्य दिवंगत शिवाजीराव गिरीधर पाटील, भिकू दाजी भिलारे व निशिकांत माधव जोशी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.
सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवाजीराव पाटील यांनी अनेक सामाजिक, सहकारी संस्थामध्ये विविध पदांवर उत्कृष्ट काम केले. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१३ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील भिलारे गुरूजी यांच्या कार्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातूनही भिलारे गुरूजींनी भरीव कार्य केले. भिलारे गुरूजींनी सर्वोदय परिवाराच्या माध्यमातून भूदान चळवळीत स्वत:ची जमीन देऊन चळवळ रूजविण्यात मोलाचे योगदान दिले.
कोकण विकासासाठी तळमळीने काम करणारे निशीकांत माधव जोशी यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, दैनिक सागर या वृत्तपत्राच्या माध्यमातून दर्जेदार लेखनाद्वारे जोशी यांनी सातत्याने कोकण विकासाची भूमिका मांडली. शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांना सह्याद्री वाहिनीतर्फे रत्नदर्पण पुरस्काराने तर कुवैतमध्ये एक्सलन्स ऑफ कोकण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अनुमोदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच मंत्रिमंडळातील सदस्य एकनाथ शिंदे, जयकुमार रावल, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह विधानसभा सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, भास्करराव जाधव, सदानंद चव्हाण यांनीही शोकभावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृहाच्या वतीने सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली