नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान सन्मान संमेलनात विदर्भातील ओबीसी समाजाच्या प्रमुख संघटनांनी स्वतःची उपेक्षा झाल्याचा आरोप केला आहे. या संघटनांनी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले, तसेच त्यांना व्यासपीठावर स्थान न दिल्याने त्यांचा रोष उफाळून आला आहे.
भाजपाने या कार्यक्रमावर टीका करताना म्हटले की, “काँग्रेसचा हा कार्यक्रम संविधानाचा सन्मान करण्यासाठी नसून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित केला गेला आहे.” महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संमेलनाचे संचालन केले, पण अन्य प्रमुख ओबीसी नेत्यांना डावलण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. काही ओबीसी संघटनांनी निमंत्रण मिळाल्यानंतरही संमेलनावर बहिष्कार टाकला, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे उपस्थितांच्या चर्चेतून समोर आले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरून ‘लाल पुस्तिका’ दाखवली. परंतु, या प्रतिकात्मक कृतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी चर्चा आहे. या कारणावरून राहुल गांधी यांनी आयोजकांची कानउघडणी केल्याचेही बोलले जात आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी दिलेल्या घोषणांवरही टीका करण्यात आली. महिलांना बोलण्याची संधी न मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरला. काही महिला कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले, मात्र त्यांना न बोलताच खाली बसवण्यात आले. “महिलांवर अन्याय करून फक्त घोषणांवर भर देण्याचा हा कुठला न्याय?” असा सवाल महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनीही या कार्यक्रमाला अलिप्त राहणे पसंत केले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चाही रंगली.
भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “कालचा संविधान सन्मान संमेलन हा ओबीसी समाजाच्या हितासाठी नव्हता, तर लाल पुस्तकाच्या प्रचारासाठी होता.”