
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील भाजप महायुतीचा विजय हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा विजय मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मुंबई शहरामध्ये जे क्रांतिकारी परिवर्तन केले त्या विकासाचा हा विजय आहे, असे प्रतिपादन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केले.
यावेळी बोलताना, आमदार अमीत साटम म्हणाले की, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा विजय आहे. मुंबईकरांनी इतर आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये चालत असलेले षडयंत्र ओळखून मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव केलेला आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे. कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांची सेवा केली, त्यामध्ये ५६ कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांना हा विजय अर्पण करतो, असे आमदार अमीत साटम म्हणाले.
या यशासाठी मी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन जी, देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह जी व राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष जी तसेच राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजींचे त्यांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो, असे आमदार अमीत साटम म्हणाले.
येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता भारतीय जनता पार्टी व महायुती कार्यरत राहील असा आम्ही संकल्प करतो, असे आमदार अमीत साटम म्हणाले.















