डोंबिवली, (प्रशांत जोशी) : राज्यात आपल्याच बांधवाना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात पुरेसे पाणी असून आपल्याला पाण्याची बचत करावी लागणार आहे. आपण सर्वांनी पाण्याची बचत केली तरच गावोगावी पाण्यासाठी व्याकूळ असणाऱ्या नागरिकांना येथून पाण्याचे टँकर पाठवणे सोपे जाईल. आपल्या विभागात स्वच्छता राखा आणि पाण्याचे नियोजन करा असे आवाहन पश्चिम विभागातील जेष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी केले. म्हात्रे यांनी सिद्धार्थ नगरातील पायवाटा आणि बंदिस्त गटाराच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन केले त्यावेळी त्यांनी दलित वस्तीतील नागरिकांना मोलाचा सल्ला दिला.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्र. 65 मधील सिध्दार्थनगर येथे पायावाटा व बंदिस्त गटाराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. रमेश म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले. दोन स्थळी भूमीपूजन करण्यात आले यावेळी महिला व जेष्ठ नागरिकांना भूमीपूजनात सहभागी करण्यात आले होते.
पंचवीस वर्षापूर्वी सिद्धार्थ नगरात पायवाटा व गटारांचे काम करण्यात आले होते. या वस्तीत नागरिकांना स्वच्छ आणि दूर्गंधीमुक्त जीवन जगता यावे म्हणून सिध्दार्थनगर मधील पायावाट व गटारांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. पायावाटा शेजारील गटार बंदिस्त करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नूतनीकरणाचे काम होत असून सुमारे 41 लाख रुपये खर्ची होणार आहेत. येथील नुतनिकरण विकास कामांअंतर्गत बंदिस्त गटारे, विद्युत रचना, पायवाटा, रस्ते अशी कामे होणार असून या नगरातील लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे. परंतु येथील नागरिकांनी विभागात स्वच्छता राखली पाहिजे. यामुळे रोगराई होणार नाही. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा यामुळे बचत झालेले पाणी इतरांना देता येईल असा मोलाचा सल्ला यावेळी उपस्थित नागरिकांना दिला. भविष्यात या वस्तीत आणखीही पायाभूत विकास कामे केली जातील असे आश्वासनही दिले.