नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकत असून, उद्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, दि.13 जून रोजी सकाळी ताशी 145 ते 170 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या वेळी दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.