मुंबई : वेदांता लिमिटेड या जगातील एका आघाडीच्या तेल व वायू आणि धातू कंपनीने महिनाभराच्या कोरड्या धान्याच्या रूपामध्ये मुंबईतील वरळी कोळीवाडा येथील 14000 कुटुंबांना मदत केली आहे. ही 14000 कुटुंबे दैनंदिन रोजगारावर काम करत असून, प्रामुख्याने कोळी समाजातील आहेत आणि घातक कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा त्यांच्यावर विपरित परिणाम झाला आहे.
वरळी कोळीवाडा येथे रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, या परिसरातील संपूर्ण मच्छिमार वस्ती गेल्या आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. यामुळे या समुदायावर मोठा परिणाम झाला आहे. प्रामुख्याने हा समुदाय रोजंदारीवर काम करतो. सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये, वेदांताने 14000 कुटुंबियांशी संपर्क केला आहे आणि लॉकडाउनच्या काळामध्ये या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अन्नधान्याची सोय केली आहे.
“मला रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मोठी काळजी वाटते. वरळीतील कोळीवाडा येथे रुग्णसंख्या वाढत असल्याचे आणि संपूर्ण परिसर बंद केल्याचे मी ऐकले. माझ्या घरापासून हा परिसर अतिशय जवळ आहे. तेथील मच्छिमार बांधवांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे आम्ही ठरवले. सध्याच्या तणावाच्या काळामध्ये ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्या पाठिशी आपण उभे राहायला हवे व त्यांना आधार द्यायला हवा. कोरोनाचा सामना करण्यासाठी कॉर्पोरेटनी सरकारला मदत करणे महत्त्वाचे आहे”, असे वेदांता रिसोर्सेस लि.चे कार्यकारी अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
“या लॉकडाउन कालावधीमध्ये सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी ही तरतूद पुरेशी ठरेल, अशी अपेक्षा आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी समाजाला आणि प्रामुख्याने रोजंदारी करणाऱ्यांना व अल्प उत्पन्न गटांना मदत करण्यासाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही नक्की करू”, असे अग्रवाल यांनी नमूद केले.
या मदतीबद्दल बोलताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले, “वेदांताच्या उपक्रमाचे मी स्वागत करतो. अशा संकटाच्या वेळीच आपण सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे असते. अनेक कंपन्या आणि एनजीओ राज्य सरकारला मदतकार्यामध्ये सहकार्य करत आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.“
कोविड-19 या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वेदांताने देशभर एक विशिष्ट निधी निर्माण केला आहे. हा फंड रोजंदारीवरील कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे व कंत्राटी कामगारांचे अर्थार्जन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यासाठी सेवा देणार आहे आणि कंपनीच्या निरानिराळ्या प्रकल्पांमधील व आजूबाजूच्या लोकांना वेळेवर मदत देणार आहे. तसेच, वेदांता व कंपनीच्या उपकंपन्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी विविध विकास उपक्रमांबरोबर काम करत आहेत. वेदांता लिमिटेडच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व फिरत्या आरोग्य व्हॅन या स्थानिक समुदायांना दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमध्ये सहकार्य करणार आहेत.