मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील 14 किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पद्धतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिद्ध केले असल्याने वाचकांना आता चित्रातून गंडसवंर्धनाच्या वाटा समजण्यास मदत होणार आहे.महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारशांमधून आपल्याला महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेले गड किल्ले बघितले तर महाराष्ट्राची ओळख जास्त अधोरेखित होते. महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या इतिहासाचे कायमस्वरुपी जतन करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कशा पध्दतीने प्रयत्न करण्यात येत आहे याचा सचित्र अनुभवच “गड संवर्धनाच्या मार्गावर” या पुस्तक रुपातून वाचकांना वाचायला मिळणार आहे.राज्य शासनाकडे संरक्षित असलेल्या 49 गडांपैकी 28 दुर्गांच्या जतनासाठी संचालनालयाने शासनाच्य साहाय्याने पुढाकार घेतला आहे. दुर्गसंवर्धन टप्पा-1 योजनेअंतर्गत पार पडलेले कार्य पहिल्यांदाच पुस्तकरुपाने वाचकांच्या समोर आले आहे हे विशेष. महाराष्ट्र राज्यात अंशात्मक टिकून राहिलेले, थोडेफार अवशेष असलेले, फक्त तटबंदीच्या स्वरुपात शिल्लक असलेले आणि बऱ्यापैकी टिकून असलेले असे सर्व मिळून 350 किल्ले आहेत. या किल्ल्यांपैकी 47 किल्ले राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून ते केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आखत्यारित आहेत तर 49 किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहेत. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या किल्ल्यांचे रक्षण करणे त्यांचे जतन करण्याचे काम पुरातत्व विभाग करीत आहे. महाराष्ट्राचा इतिहास अतिशय अभिमानास्पद आहे. परकीय सत्तेशी दिलेल्या झुंजीचे साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्यांचे संवर्धन म्हणजे इतिहासाप्रती जणू कृतज्ञता आहे. गड-संवर्धन योजनेंतर्गत राज्यातील 28 किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुन दिले जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 14 किल्ल्यांच्या जतनासाठी शासनाने केलेले कार्य ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने आतापर्यंत 14 किल्ल्यांच्या जतनासाठी कोणकोणते प्रयत्न केले आणि यामुळे या किल्ल्यांचे जतन कसे झाले याबाबतची सविस्तर माहितीच जणू या पुस्तकरुपात मांडली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध विकासाच्या अंगापैकी वारसा जतन हे एक महत्वाचे अंग आहे. गड किल्ले हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्वपूर्ण वारसा आहे. या गड किल्ल्यांचे चांगल्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन-संवर्धन व्हावे यासाठी शासनाने गड संवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीला काही थोड्याच किल्ल्यांची निवड करुन त्याचे सर्वांगीण जतन संवर्धनाचे काम चांगल्या तऱ्हेने यशस्वी झाले आहे. त्याच नमुन्याच्या धर्तीवर (मॉडेल फोर्ट) अन्य गड कोटांचे संवर्धन व्हावे, अशी मूळ कल्पना होती. या कल्पनेला अनुसरुन प्रथम 14 किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा सांस्कृतिक कार्य विभागाने व पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने यशस्वी केला आहे.या पुस्तकात रत्नागिरीतील शिरगाव किल्ला, नाशिक जिल्हयातील खर्डा किल्ला, गाळणा किल्ला, पुणे जिल्हयातील तोरणा आणि भूदरगड किल्ला, औरंगाबादमधील अंतूर, परांडा आणि धारुर किल्ला, नांदेड मधील औसा, कंधार आणि माहूर किल्ला, नागपूरच्या नगरधन, अंबागड आणि माणिकगड येथील जतन आणि दुरुस्ती कशी करण्यात आली याबाबतची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभराच्या काळात दुर्ग संवर्धन कार्यशाळा, गड किल्ले स्वच्छता अभियान असे उपक्रम राबविण्यात आले याबाबतही यामध्ये माहिती देण्यात आली आहे.“संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग” अशा शब्दांत महत्व वर्णिलेले महाराष्ट्रातील गड-किल्ले हे एका वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. महाराष्ट्राच्या या गौरवशाली वारशाचे संवर्धन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. राज्यातील गड संवर्धनाचे काम गड-संवर्धन समितीच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पध्दतीने कसे पूर्ण करण्यात आले ते या पुस्तकात मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे जतन-दुरुस्ती कामापूर्वी आणि जतन- दुरुस्ती कामानंतर या गड किल्ल्यांचे स्वरुप कसे बदलले आहे हे या पुस्तकाच्या माध्यमातून जनसामान्यांपासून ते इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि यामुळे राज्याच्या सांस्कृतिक वारशाबद्दल आपल्या प्रत्येकामध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.