मुंबई : कोकणातील बोलीभाषा असणार्या मालवणीला सातासमुद्रापार नेण्यात माझ्या वस्त्रहरण नाटकाची भूमिका महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन नाटय संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मराठी भाषा पंधरवडा – २०१७’ चा शुभारंभ मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२७ फेब्रुवारी) महापालिका मुख्यालयातील सभागृहात केला, त्यावेळी मराठी भाषेतील नाटयसंपदा या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून गवाणकर नोलत होते.
आमदार सुनिल प्रभू, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, महापालिका आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, भाजपा गटनेते मनोज कोटक आदी यावेळी उपस्थित होते.
मराठी भाषेवर नितांत प्रेम करा, तिचा मान राखा आणि दैनंदिन जीवनात मराठीचाच कटाक्षाने उपयोग करावा, असे आवाहन महापौरांनी केले.
गंगाराम गवाणकर यांनी पु.ल.देशपांडे यांचा एक किस्सा यावेळी सांगितला. पु.ल. यांनी पुण्याला जेव्हा वस्त्रहरण नाटक बघितले तेव्हा हे नाटक मला पुन्हा पुन्हा बघायला तर आवडेल पण त्यापेक्षाही एखादी छोटी भूमिका मला या नाटकात करता आली तर ते अधिक बरे होईल असे लिखीत पत्र आपल्याला पाठविल्याची नोंद मी माझ्या आत्मचरित्रात घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ नाटय कलावंत प्रदीप कबरे यांनी गवाणकर यांच्या व्हाया वस्त्रहरण या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील मुंबई- हिंदी, राजापूर- मालवणी या प्रसंगाचे वाचन केले. गवाणकर यांचा महापौरांनी सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या संगीत – कला अकादमीच्या चमुने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विविध गीते सादर केली. सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रवींद्र काळे यांनी सूत्रसंचालन केले.