रत्नागिरी : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज ५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिट आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल आणि येथील शेतकरी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले पहावयास मिळतील. यातून कोकणचा कायापालट झालेला पहावयास मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव या दाम्पत्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प आता पूर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे.
चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी सुभाषराव चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील मोठा पल्ला गाठला. दि. १९ ऑक्टोबर १९९३ रोजी नोंदणी झालेल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आज महाराष्ट्रभर आपला विस्तार केला आहे. पारदर्शक कारभार आणि सभासद, कर्जदार, ठेवीदारांचा विश्वास दृढ असल्यानेच हे सारे शक्य झाले. याच विश्वासाच्या बळावर आत्मविश्वास आणखी वाढत गेला आणि कोकणात सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी आर्थिक बळ देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी, इथल्या तरुणांना रोजगाराची संधी खुली करण्यासाठी चव्हाण साहेबांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांना दूध चळवळीत सक्रिय करण्याचे ठरवले आणि त्यातूनच मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आली.
कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करणारे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, हे चव्हाण साहेबांचे स्वप्न आहे आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पाचे काम अल्पावधीतच पूर्णत्वास गेले आहे. “कणा कणात कोकण” या ब्रीद वाक्याप्रमाणे हा प्रकल्प आता कोकणवासियांच्या सेवेत दाखल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत तर विशेष उपस्थिती सिक्कीमचे माजी राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवासजी पाटील, आमदार शेखरजी निकम, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार योगेशजी कदम, आमदार प्रसादजी लाड, आमदार सदानंदजी चव्हाण, उद्योजक लक्ष्मणराव कदम या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
एक लाख लिटर क्षमतेचा हा अत्याधुनिक प्रकल्प आपणा सर्वांच्या सदिच्छा, शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि विश्वास या बळावर आजपासून कार्यरत होत आहे. तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि साथ या दुग्धप्रकल्पासाठी कायम राहावी, अशी अपेक्षा या प्रकल्पाचे संचालक प्रशांतजी यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी व्यक्त केली आहे.
वाशिष्ठी डेअरीचे प्रॉडक्टस्-
दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी, पेढा या दुग्धजन्य पदार्थि उत्पादन वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. अतिशय आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
*प्रकल्पाची वैशिष्ट्ये*
प्रकल्पाच्या आखणी, नियोजनासाठी अनुभवी प्रोजेक्ट कन्सल्टंट, डेअरी कन्सल्टंट आणि टेक्निकल टीमची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक व स्वयंचलित दूध संकलनासाठी १० गावे मिळून एक कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आली आहेत आणि भविष्यात सुरू केली जाणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी विभागवार दूध वितरण केंद्रे सुरू केली जात आहेत. यामध्ये बल्क मिल्क कुलर सेंटर मालघर, आंबडस, दस्तुरी, वेरळ, खेरशेत, या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. तर कलेक्शन सेंटर सावर्डे, कालुस्ते, भोम, शिरगाव, म्हाळुंगे, पालगड, दळवटणे, गुणदे, धामणंद, तळी, काडवली, कुंबळे या गावांचा समावेश आहे.
या केंद्रांच्या माध्यमातून म्हशींचे दूध ५ हजार तर गायीचे दूध ७ हजार लिटर प्रतिदिन असे एकूण १२ हजार लिटर प्रतिदिन दूध मिळत आहे. फुल क्रीम दूध व गायीचे दूध, टोंडदूध असे दूध पॅकेजिंग केले जाते. यासाठी ५ हजार लिटर प्रतिदिन दूध वापरले जाते. तसेच दूध उत्पादन व उपउत्पादनासाठी दररोज २ हजार लिटर दुधाचा वापर केला जातो. या दुधाचे वितरण चिपळूण शहर, ग्रामीण विभाग, लोटे, खेड, भरणे, अलोरे, गुहागर, संगमेश्वर, पुणे याठिकाणी होत आहे. तत्पूर्वी प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी दुधाचे पैसे अदा केले जात आहेत. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास वेळ लागणार नाही. एकंदरीत हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शेतकऱ्यांना गाई-म्हशींचा पुरवठा, खाद्याचा पुरवठा आणि पशुवैद्यकीय सुविधांचा पुरवठा केला जाईल. शेतकऱ्यांसह हजारो तरुणांना रोजगाराची संधी प्रकल्पाच्या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी स्वतःचे पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रकल्पाबरोबरच दूधसंकलन क्षेत्रात दुधाचा दर्जा तपासण्यासाठी अद्यावत लॅबोरेटरीज व मोबाईल व्हॅन असणार आहे, हा सर्वसामान्यांचा प्रकल्प असेल. हा प्रकल्प खासगी असला, तरी “सहकार तत्त्वावरच” या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पारदर्शक कारभार आणि आपलासा वाटणारा प्रकल्प म्हणून अल्पावधीतच हा प्रकल्प संपूर्ण कोकणात आदर्शवत ठरेल.
सुभाषराव चव्हाण साहेब यांनी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात सांगितले होते, की हा प्रकल्प सर्वसामान्य घटकांसाठी असेल. साहेबांचा हा विश्वास आणि या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रामाणिकपणे झटणारे हात यामुळे नक्कीच हा प्रकल्प यशाचे शिखर गाठेल यात शंका नाही. कोकणातील शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनातून रोजगार मिळेल. सुमारे २५० कामगारांना या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार मिळेल. अनेक छोट्या-मोठ्या वितरकांना, दुकानदारांना, वाहतूकदारांना या प्रकल्पाचा फायदा होईल. आजच्या स्थितीत जवळजवळ १०० लोकांना रोजगार व ८०० हून अधिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून फायदा मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील अर्थकारण वाढीस निश्चितच हातभार लागेल आणि कोकणात या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारी आर्थिक समृद्धी आलेली पहावयास मिळेल.