सुभाषराव चव्हाण यांचा विश्वास; खेरशेत येथे दूध संकलन केंद्राचे शानदार उद्घाटन
चिपळूण : मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केला. वाशिष्ठी पंचक्रोशी सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या खेरशेत येथील दूध संकलन केंद्राचे आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते फित कापून तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून खेरशेत येथील दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. चव्हाण यांनी कोकणातील दुग्धव्यवसायाच्या स्थितीबाबत माहिती देत जिल्हा सहकारी बँक, चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे प्रयत्न भविष्यात केले जातील, असे सांगितले. दुग्धप्रकल्प चालवताना विश्वासार्हता महत्त्वाची असते. ती जपण्यासाठी तशी कार्यपद्धती वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून अवलंबली जाईल, असा खात्रीही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष खेराडे, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत जाधव, कोकरेच्या सरपंच विनया दळवी, कळंबुशीचे सरपंच सचिन चव्हाण, सरंदचे उपसरपंच उमेश पवार, जागा मालक मनोहर अप्पा साठे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सोमा गुडेकर, गुलाबराव सुर्वे, अशोक साबळे, कोकरे सोसायटीचे अध्यक्ष परशुराम दळवी, खेरशेत ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत साळवी, खेरशेतचे पोलिस पाटील, अमर जाधव, कुशिवडेचे पोलिस पाटील मंगेश नारकर, मंडप डेकोरेटर विजय कुवळेकर, श्रीराम शिंदे, पोलिस पाटील नंदन भागवत, जय विचारे, गणपत चव्हाण, सुरेश सावंत, दिलीप सुर्वे, रमेश साळवी, संभाजी दळवी, मारूती रांबाडे, दिलीप सुर्वे, प्रवीण साठे, ज्येष्ठ पत्रकार जाकीर शेकासन, अशोक जाधव, गोपाळ खांडेकर, कोंडीवरे सोसायटीचे सुलतान कापडी, प्रकाश पोंक्षे, सुनील सहस्रबुद्धे, सिराज तांबे, नंदकुमार चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे संचालक, अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात दुग्धप्रकल्प उभारण्याची संकल्पना स्पष्ट केली. तसेच शेतकऱ्यांना वाशिष्ठीच्या माध्यमातून योग्य हमीभाव दिला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. कोकणातील शेतकरी टिकला पाहिजे, उभा राहिला पाहिजे, या उद्देशानेच हा प्रकल्प उभारण्यात आल्याचे श्री. यादव यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी गाई-म्हशी खरेदीसाठी शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही यावेळी श्री. यादव यांनी दिली.
वाशिष्ठी डेअरीच्या दूध संकलनाला चिपळूण तालुक्यासह नजीकच्या तालुक्यांमधून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी वाशिष्ठी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मालघर, वेरळ, दस्तुरी-चिंचघरी, आंबडस, पिंपळी खुर्द येथे वाशिष्ठी डेअरीच्या परिसरात, कापसाळ येथे दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खेरशेत येथे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.