मार्च २०२३ अखेर दूध संकलन बिलाच्या रक्कमेवर शेतकऱ्यांना बोनस जाहीर
चिपळूण : वर्षभराच्या कालखंडात सुरू झालेल्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कोकणात प्रथमच वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या दूध संकलन केंद्रावर दूध संकलित करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च २०२३ अखेर दूध संकलन बिलाच्या रक्कमेवर बोनस जाहीर केला आहे. तसेच सुरक्षा ठेव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात येत आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना आगळीवेगळी दिवाळी भेट मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ही भेट ४ हजार १६७ शेतकऱ्यांना अदा केली गेली जात आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांच्याच वाढदिनी ७ सप्टेंबर २०२१ रोजी मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या प्रकल्पाची उद्योजक प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या प्रयत्नातून यशस्वी वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पाला शेतकरी व ग्राहकांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद दिला आहे.
या प्रकल्पाचे मालघर, आंबडस, पिंपळी, खेरशेत, दस्तुरी, वेरळ, साडवली, कराड, दापोली, करबुडे आदी ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू झाली असून, या केंद्राच्या पंचक्रोशीतील शेतकरी या दूध संकलन केंद्रावर दूध देत आहेत. शेतकऱ्यांना दुधाचे बिल दर १० दिवसांनी शेतकऱ्यांना अदा केले जात असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
या वाशिष्ठी डेअरीच्या एकूण ४७ दूध संकलन केंद्रावर ४८६७ शेतकऱ्यांकडुन दररोज ३१ हजार लिटर दुध संकलित होत आहे. दूध संकलित करतांना शेतकऱ्यांकडून सुरक्षा ठेव घेतली जाते. ही रक्कम दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना अदा केली गेली जात आहे. तसेच विशेष म्हणजे २०२२ ते मार्च २०२३ वर्षातील सात महिन्यांच्या कालावधीत दूध संकलित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक बिलाच्या रक्कमेवर बोनस जाहीर करण्यात आला असून हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केला जात आहे. वाशिष्ठी डेअरीने शेतकऱ्यांना आगळीवेगळी भेट दिल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अल्पावधीत सुरू झालेल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सने शेतकऱ्यांच्या मेहनत व कष्टाला न्याय दिला आहे. तरी कोकणातील शेतकऱ्यांनी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाशी संलग्न व्हावे, असे आवाहन या प्रकल्पाचे मुख्य संचालक प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.