मुंबईः विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले आहे. ते मूत्रपिंडाच्या प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांची बॉम्बे रुग्णालयात प्राणज्योत मालवली. शुक्रवारी ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विधानपरिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंसत डावखरे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या महिन्यात बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्याने गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक वजनदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
उमदा नेता गमावला – मुख्यमंत्री
विधानपरिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतीव दुःख व्यक्त केले. डावखरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.