मुंबई : वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. वर्सोवा हा चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांच्या वास्तव्यामुळे भूषणावह ठरला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्सोवा फेस्टिवल २०१९ च्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. वर्सोव्यातील चित्रकूट मैदानावर १५ ते २२ जानेवारी या कालावधीत फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी व्यासपीठावर वर्सोवा फेस्टिवल २०१९ च्या संयोजिका आमदार भारती लव्हेकर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, ज्येष्ठ संगीतकार आनंदजी, निर्माता दिग्दर्शक सुभाष घई, लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर, शिवसंग्रामचे तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते चित्रपट निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर, निर्माता दिग्दर्शक साजिद नाडीयादवाला, अभिनेत्री – गायिका सलमा आगा, अभिनेत्री निशिगंधा वाड, कुस्ती प्रशिक्षक भरत यादव, अनुपा के. पब्लिक स्कूलचे आदित्य यादव, ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभोजकर, नेत्र शल्यविशारद डा. एस. के. गुलचंदानी, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. अजय कौल, भोजपुरी अभिनेती रवी किशन आदींना वर्सोवा गौरव 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वर्सोव्यातील विविध क्षेत्रांना एकत्र आणून अभिसरणाचे काम घडते आहे. या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. वर्सोव्याच्या विकासाच्या कामांसाठी नेहमीच सकारात्मक पाठिंबा राहील. केंद्र सरकारने सीआरझेडचे नव्याने मानांकन केल्याने, कोळीवाड्यांतील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविता येईल. त्यांच्या विकास कामांचा मार्ग सुकर झाला आहे. रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर्स आदी सुविधांसाठी पाठपुरावा केला जाईल. एक दोन वर्षात या ठिकाणी मेट्रो सुरु करण्यात येईल.नरिमन पॉईंटपासून वर्सोव्यापर्यंतच्या प्रवासास कमी वेळ लागावा अशा सुविधा निर्माण केल्या जातील. एसव्हीपीनगर अमरनाथनगर पुलासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. स्टेडीयमसंदर्भातही एमएमआरडीएला निर्देश दिले जातील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.वर्सोव्यातील कोळीवाड्यांचे सीमांकन आणि त्यासाठीचा स्वतंत्र डीसीआर तयार करण्यात आला. जोड रस्त्यासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आले. वर्सोवा ते सी – लिंकचे कामही मार्गी लागले आहे. गत चार वर्षांत मागणी केलेल्या सर्व कामांना सुरुवात झाल्याचे नमूद मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्सोवातील नागरिकांच्या मागण्यांची वचनपूर्ती केल्याचे आमदार लव्हेकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले.सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलनाने फेस्टीवलचे उद्घाटन करण्यात आले. आमदार लव्हेकर यांच्या कामाच्या अहवाल पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. आमदार श्री. मेटे तसेच अभिनेत्री श्रीमती वाड यांचीही भाषणे झाली.