मुंबई : स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर आहे. ही जनजागृती करण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्त्वाची होती, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छतेचा महाजागर’ या कार्यक्रमात बागडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील तसेच संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार, किर्तनकार, दिंडीकरी उपस्थित होते.यावेळी बागडे म्हणाले, स्वच्छतेचा महाजागर या कार्यक्रमातून वारकरी संप्रदायामार्फत विद्यार्थ्यांचे मन घडविण्याचे काम होणार असून त्यातूनच स्वच्छतेविषयी जागृतीचेही काम करण्यात येईल. या जागृतीतूनच विद्यार्थीच्याकडून कायमस्वरुपी स्वच्छता राहण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
हागणदारीमुक्त महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे – बबनराव लोणीकर
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर म्हणाले, समाज परिवर्तनात संतांचे कार्य महत्त्वपूर्ण असून हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यात वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. या योगदानामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वच्छ महाराष्ट्राचे (ग्रामीण) स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. राज्यात 60 लाख शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हा स्वच्छतेचा जागर अखंड चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन वारकरी साहित्य परिषदेचे प्रवचनकार, किर्तनकार 40 हजार गावांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढून प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या कुटुंबाला स्वच्छतेसाठी जागृत करणार आहेत.शालेय शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, वारकरी साहित्य परिषदेच्या प्रवचनकार, किर्तनकारांनी गावागावात जाऊन एका दिवसासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन करावे. यातूनच घरातील माणूस जोडण्याचे काम होईल, हे पुढील पिढीसाठी महत्त्वाचे आहे.