मुंबई : मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी वांद्रे येथे घडली. बेहरामपाडा येथील इंदिरा नगरमध्ये सकाळी १० वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास वैतरणा येथून येणारी ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फूटली. परिसरातील झोपड्यांमध्ये पाणी घुसले. पाण्याच्या प्रवाहात बुडून विघ्नेश डोईफोडे या आठ महिन्यांच्या बाळाचा आणि प्रियंका डोईफोडे या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यांना तात्काळ भाभा आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज पालिकेत उमटले. मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख आर्थिक सहाय्य महापालिकेने द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक आलिम खान यांनी केली आहे.
इंदिरा नगर येथील अनधिकृत झोपड्यांना पालिकेकडून २०१५ मध्ये नोटीसा देण्यात आल्या होत्या. जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंकडे असलेल्या झोपड्या हटविण्यास उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पालिकेने यावर कारवाई केलेली नाही. दरम्यान, येत्या ऑक्टोबरपर्यंत येथील झोपड्या हटविण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती, एच वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.