रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज चौथा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मारुती काका जोशी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी एकूण चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी आपले अर्ज दाखल केले होते. या रिंगणात आता बहुजन आघाडी देखील उतरली आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली होती. वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली ही सभा झाली होती. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून वंचीत विकास आघाडी तर्फे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
काही दिवसांपूर्वीच मारुती काका जोशी यांचे नाव जाहीर झाले होते. त्यानुसार मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती काका जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज भरण्यापूर्वी मारुती मंदिर येथून वंचित बहुजन आघाडीची रॅली निघाली. जोरदार घोषणाबाजी करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले आणि त्यानंतर जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.