मुंबई : राज्यात येत्या १ जुलै ते ७ जुलै २०१७ या वनमहोत्सवाच्या कालावधीत ४ कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि वसुंधरेचे ऋण फेडावे, ती संधी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
काल अध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या सह्याद्री अतिथीगृहात बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक व्यक्ती पर्यावरण रक्षणाचा सेनापती झाला पाहिजे असे आवाहन करून वनमंत्री म्हणाले की, प्रत्येक धर्मात वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडे लावणे हे एक संविधानिक कर्तव्यही आहे. बदलत्या तापमानाला सामोरे जातांना ग्लोबल वॉर्मिंगसारख्या विषयाला प्रत्यक्षातून परत डिक्शनरीत पाठवायचे असेल तर वृक्ष लागवड महत्वाची आहे. जग आता दरडोई उत्पन्न मोजण्यापेक्षा दरडोई आनंद मोजतो आहे. भूतान हा देशातील सर्वात सुखी देश जाहीर झाला आहे कारण इथे कोणताही प्रसंग मग तो सुखाचा असो किंवा दु:खाचा तो वृक्ष लावून साजरा केला जातो. त्यामुळे वृक्ष आणि आनंदाची संकल्पना ही पूरक आहे हे सिद्ध होत आहे. जीवसाखळीतले सगळे जीव हे निसर्गचक्रानुसार वागतात परंतू मनुष्य हा एकच प्राणी असा आहे जो वसुंधरेचे शोषण करतो, नदीला माता मानतो, तीच नदी प्रदुषित ही करतो. आता पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबला पाहिजे. त्याकरिता सर्वांनी या कामात सहभागी होत आपले योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
अध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीमध्ये मागील वर्षीही योगदान दिले यावर्षीही ते या संकल्पात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या सर्व संस्थांनी वृक्ष लागवडीत त्यांनी केलेलं प्रत्येक काम वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्व संस्थांनी स्वयंसेवकांच्या माध्यमातून वृक्ष जगवण्याची हमी देखील घ्यावी, असे सांगतांना ते पुढे म्हणाले की, वृक्ष लागवडीसाठी अतिशय वाजवी दराने म्हणजे १ /३ दराने रोपं उपलब्ध होतील. मुंबईत बृहन्मुंबई महानगरपलिका मोफत रोप देणार आहे. वृक्ष आपल्या दारी सारखी संकल्पना वन विभाग राबवित आहे. रोप कसं लावायचं ही देखील एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे. यासंबंधीचे मार्गदर्शन हवे असल्यास वन विभाग सर्वांना सहकार्य करील तसेच वर्षभर अनेक संस्था मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करत असतात त्यांच्यासोबत त्रिपक्षीय करार करून वन विकासाचे काम त्यांच्या माध्यमातून करता येईल.
वन विभागाने हरित महाराष्ट्र तसेच १९२६ हॅलो फॉरेस्टसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचे सांगून वनमंत्री पुढे म्हणाले की, येत्या तीन वर्षात महाराष्ट्रात लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लावावयाचे आहेत. झाडे तोडणाऱ्यांपेक्षा झाडे लावणाऱ्या हातांची संख्या आपल्याला वाढवायची आहे. धन एका जन्मी कामाला येईल पण वन पुढच्या दहा पिढ्यांना जीवन देईल, त्यामुळे वृक्ष लागवडीत सर्व संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधी- स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, एक मिशन म्हणून या उपक्रमाला पुढे न्यावे.
समाजाप्रती आपण काय करतो किंवा काय केलं पाहिजे ही भावना महत्वाची असल्याचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले की, वातावरणीय बदलाला सामोरे जातांना सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीसारखा महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. हे काम आपल्या सर्वांच्या जीवनासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे आपण सर्वजण मिळून वृक्ष लागवडीत सहभागी होऊ. मागच्या वर्षी दोन कोटी वृक्षांपेक्षा अधिक झाडे लावली, आता चार कोटी वृक्षांपेक्षा अधिक झाडे लावू, असेही ते म्हणाले.
मोबाईल ॲपवरून हरित सेनेत सहभागी होता येईल असे वन सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले. आध्यात्मिक संस्थांनी प्रसादाच्या स्वरूपात त्यांच्या भक्तांना रोप द्यावे, लोकांच्या मनात वृक्ष लावण्याची आणि संगोपनाची भावना निर्माण करावी, असे आवाहन करतांना त्यांनी वृक्ष लागवडीत लोकांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. ज्यांच्याकडे वृक्ष लागवडीसाठी जागा नाही त्या संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वयंसेवक म्हणून वन विभागासोबत काम करावे, लावलेले वृक्ष जगवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. बैठकीस उपस्थित सर्व मान्यवरांना तुळशीचे रोप भेट देण्यात आले.
बैठकीस आमदार मंगलप्रभात लोढा, वन सचिव विकास खारगे यांच्यासह विविध अध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई, ब्रम्हकुमारीज, संत निरंकारी मंडळ, जीवन विद्या मिशन,पतजंली, सिद्धीविनायक मंदिर, रामकृष्ण मिशन, हनुमान टेकडी, सायन, जेसीआय-मरिनलाईन्स व रॉयल राजस्थान क्लब, आर्ट ऑफ लिविंगचे प्रतिनिधी, फाम अर्थात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे प्रतिनिधी, युवा सेवा ग्रुप, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान तसेच लायन्स क्ल्ब इंटरनॅशनल चे प्रतिनिधी उपस्थित होते.