मुंबई : पालिका शाळेचे स्थलांतर झाल्याने घटलेली विद्यार्थी संख्या वाढवण्य़ाचे काम पालिकेच्या बससेवेने साधले आहे. शाळेत जाण्यासाठी बससेवा सुरु झाली आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बस आली आणि क्षणार्धातच ८० ते ९० विद्यार्थी त्यात शिरले. मालाडच्या वळणई वसाहतीतून गच्च भरलेली ही बस कांदिवलीतील इराणीवाडीत आली आणि झपझप पावले टाकत विद्यार्थी ज्ञानर्जनासाठी निघूनदेखील गेले.
मालाडच्या वळणई वसाहत महापालिका शाळेचे कांदिवलीतील इराणीवाडीत स्थलांतर झाले. परंतु, ही शाळा खूपच दूर असल्याने विद्यार्थी शाळेत जात नव्हते. शाळेच्या बहाण्याने विद्यार्थी इतरत्र हिंडत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी पाहिले. तातडीने त्यांनी वळणई येथे भेट दिली. तेव्हा विद्यार्थी शाळेतच जात नसल्याने शाळेची पटसंख्या वाढत नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्वरीत निर्णय घेतला आणि वळणई वसाहत महापालिका शाळा, मालाड (पश्चिम) ते इराणीवाडी क्रमांक ३, कांदिवली (पश्चिम) येथे महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा सुरु झाली.
वळणई वसाहत महापालिका शाळेची इमारत मोडकळीस अाल्याने पुर्णपणे पाडण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेतील १००० ते १२०० विद्यार्थ्यांचे स्थळांतर कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी क्रमांक ३ याठिकाणी करण्यात आले आहे. आता १५ जूनपासून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे गुडेकर यांनी सांगितले.
या सुविधेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण समिती अध्यक्षांनी विद्यार्थ्यांबरोबर बसमधून प्रवास केला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, प्रशासकीय अधिकारी अशोक मिश्रा, कांदिवलीचे शाखाप्रमुख दीपक मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.