डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कौस्तुभ व रोहन वैद्य यांचे मलेशियात अपहरण झाल्यानंतर त्यांची आठ दिवसांनी सुटका करण्यात आली. शुक्रवारी ते दोघे डोंबिवलीत राहत्या घरी आले. अपहरण-मारहाण करणारे कोण होते माहीत नाही. अपहरणकर्त्यांनी 1 कोटींची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने त्यांनी क्रेडिट कार्डमधून सुमारे 66 हजार व अंगावरील सोने काढुन घेतले. पुन्हा मलेशियात दिसलात तर याद राखा अशी धमकीही दिल्याची माहिती अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून आलेल्या कौस्तुभ व रोहन वैद्य यांनी डोंबिवलीतील त्यांच्या घरी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
औद्योगिक विभागातील रेल्वे सोसायटीतील वैद्य बंगला क्रमांक 14 येथे पत्रकार परिषद झाली. परिषदेत कौस्तुभ, रोहन वैद्य आणि त्यांचे काका राजीव वैद्य उपस्थित होते. यावेळी कौस्तुभ यांनी सांगितले कि, त्यांनी लॅकिंन्स मरीन कंपनीच्या माध्यमातून मिटिंगसाठी जाण्याचे ठरले होते. मिटींगला जाण्यासाठी बीएमडब्ल्यू गाडी पाठविण्यात आली होती. गाडीतून प्रवास सुरु असतानाच सुमारे 45 मिनिटानी आमच्या गाडीला अन्य गाडी ओव्हरटेक करीत आली. त्या गाडीतील 4-5 व्यक्तींनी आमच्या गाडीला घेरले आणि आमच्या गाडीतील ड्रायव्हरने गाडी थांबवून गाडीचे सेंटर लॉक उघडताच त्या 4-5 व्यक्तींनी आम्हाला मारहाण केली. त्यानंतर आमचे डोळे व हात बांधले. आम्हाला एका जंगलात ठेवण्यात आले असावे, अशी माहिती दिली.
आम्हाला 4 दिवस अज्ञात स्थळी बंदिस्त ठेवण्यात आले होते. नंतर त्यातील काही जणांनी इंग्रजीतून वडिलांना फोन कर, असे सांगून पैसे पाठविण्याची धमकी दिली. अपहरणकर्ते तामिळ भाषेत चर्चा करीत होते, असा अंदाज आहे. दरम्यान आमच्या कुटुंबीयांनी येथून पोलीस यंत्रणा तसेच शासन दरबारी केलेल्या खाटाटोपामुळे आमची सुटका झाली.
मलेशियन व भारतीय पोलीस, हायकमिशनर ऑफिस व आपल्या सरकारची मदत झाल्याने आमची सुटका झाली. आम्ही जिवंत येऊ असे वाटले नव्हते असेही ते कापऱ्या आवाजात वैद्य बंधू म्हणाले. आपल्या देशात व नातेवाईकांमध्ये पुन्हा आलो व सुखरूप आहोत अशी भावना या बंधूनी व्यक्त केली. मलेशियन पोलीसांनी संरक्षणाची हमी दिल्याने आम्ही व्यवसाय करण्यासाठी पुन्हा त्या देशात नक्की जाऊ असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला. व्यावसायिक वाद अपहरणाचे कारण असावे असेही ते म्हणाले.