शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका
रत्नागिरी, प्रतिनिधी
खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ता.1 जानेवारी 2020 ते ता.31 डिसेंबर 2020 या मुदतीत शासकीय निधी मधून त्यांच्या वाहनाला पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रकरण काय ?
खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालीकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुद्देसुत लेखी स्वरुपात केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी चौकशी करून खेडेकर यांना इंधन वापरासाठी पालिकेतून केलेल्या खर्चात अनियमीतता केल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश ता.7 एप्रिल 2022 रोजी दिले होते. त्या आदेशांच्या अनुषंगाने खेड पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात ता.30 जुलै 2022 रोजी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असुन, याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.