रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता आर के बामणे व महाडचे उप विभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या सहित एकाला पोलिसांनी आज अटक केली.
शनिवारी 29 जून रोजी नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भरणे नाका येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान वैभव खेडेकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जगबुडी पुलाच्या जोड रस्त्याबाबतच्या निकृष्ट कामाला जबाबदार अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं होतं. राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून या अधिकाऱ्यांची सुटका केली होती.
या घटनेची फिर्याद महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी दिल्यानंतर नऊ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित म्हणून नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष पवार, रहीम युसूफ सहिबोले, सागर प्रकाश कवळे, सुनील सीताराम चिले, राजेश बाळू कदम, शाम तुळशीराम मोरे, प्रमोद भार्गव दाभीळकर, राजेंद्र जगन्नाथ खेडेकर यांच्यावर १४३, १४७, १४९, ३५३, ३४२, ५०४, ५०६, १८६, १२० ब यासहित महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादिनी दिलेल्या व्हिडीओ फुटेजच्या आधारे खेड पोलिसांनी ७ संशयितांना यापूर्वीच अटक केली असून नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे व संतोष पवार या तिघांनी न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता. या अंतरिम अटकपूर्व जामीनाची मुदत आज 9 जुलै रोजी संपणार असल्याने संशयितांच्या वकिलांनी मुदतवाढ मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे यांचा हा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. या प्रकरणातील तिसरा संशयित संतोष पवार याच्या जामीन अर्जाबाबत उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर खेड पोलिसांनी या दोघांना अटक केली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू होती..