मुंबई : राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘रॅली फॉर रिव्हर’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. यावेळी वाघारी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली.ईशा फाऊंडेशनच्या वतीने नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘रॅली फॉर रिव्हर’ हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण आज राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे सद्गगुरू जग्गी वासुदेव उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, वाघारी नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनही होणार आहे.
पुनरुज्जीवन प्रकल्प हा फक्त एका जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण देशासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.वाघारी नदी पुनरुज्जीवन आराखड्यास तत्वतः मंजुरी देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या प्रकल्पासाठी आराखड्यानुसार विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.श्री. मुनगंटीवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प आवश्यक असून सध्याच्या योजनांमधून निधी पुरवठा करता येईल.सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणाले, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात सूक्ष्म सिंचनास प्राधान्य दिल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न पाचपटीने वाढणार आहे. वृक्ष लागवड, पीक पद्धती बदलणे आदींचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. ही एक लोकचळवळ म्हणून पुढे यावी.मुख्य सचिव डी. के. जैन यांनी हा प्रकल्प कृषी विभागामार्फत राबविण्याची सूचना केली.वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे सचिव विकास खारगे, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, ईशा फांऊडेशनचे युरी जैन, आनंद एथिरराजलु, कल्पना मणीर, कृष्णन सीतारामन आदी उपस्थित होते.