मुंबई: नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय’, ‘होश में आओ, भाजप सरकार होश में आओ’, ‘भाजप सरकार चले जाव’ आणि ‘जय राम ,श्रीराम, भाजपला राम राम’…महागाई विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘एवढी माणसं कशाला? मोदींच्या मयताला’, अशी घोषणा देऊन शिवसैनिकांनी सरकारची तिरडी यात्रा काढली. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते बोरिवली पर्यंत १२ मोर्चे काढून केंद्र आणि राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवसेनेचे खासदार, आमदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. अनेकांना अटक करण्यात आली होती.
पेट्रोल-डिझेलसह फळभाज्यांचे भावही गगनाला भिडल्याने राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेने म्हाडा कार्यालय वांद्रे, नॅशनल पार्क ते बोरिवली, जोगेश्वरी रेल्वे स्थानक, कुर्ला नेहरू नगर, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, कांदिवली पूर्व ते पश्चिम, दादर रेल्वे स्थानक, भांडूप पश्चिम, चेंबूर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जोरदार निदर्शने केली. चेंबूर येथे शिवसैनिकांनी भाजपने काँग्रेस सरकारच्या काळात महागाई विरोधात केलेल्या आंदोलनाच्या पोस्टरचे प्रदर्शन भरवून जोरदार निषेध नोंदविला. या मोर्चांमध्ये भाजप सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी देण्यात आली. केंद्र सरकार आणि राज्यसरकारने महागाई नियंत्रणात न आणल्यास शिवसेना देशव्यापी आंदोलन पुकारेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनावेळी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे, आमदार अजय चौधरी, नगरसेवक आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद भोसले आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांना अटक वरळी येथे करण्यात आली.
महागाईची तिरडी
शिवसेनेच्या आजच्या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. शिवसैनिकांनी भगवे झेंडे नाचवत भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. बोरिवली येथे शिवसेनेने महागाईची अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ‘जयराम, श्रीराम भाजपला राम राम’ आणि ‘होश मे आओ होश मे आओ, भाजप सरकार होश मे आओ’च्या घोषणा देण्यात आल्या.