
रत्नागिरी, प्रतिनिधी : तोक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ संपूर्ण रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्हाची वेस ओलांडल्या नंतर देखील वादळी वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले . या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे .
नौकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका
तोक्ते चक्रीवादळाने मिरकरवाडा परिसराला दणका दिला आहे . रात्रभर सुटलेल्या वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली . मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला . जोरदार वाऱ्यामुळे नौका एकमेकांवर आदळत होत्या. नौका मोठ्याने एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले . रात्रभर हा प्रकार सुरू होता . भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली .

दरम्यान मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्यु समोरील भिंत कोसळली . या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले . भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली . त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी रात्र जागून काढली.