मुंबई, विशेष प्रतिनिधी :- कोरोना विषाणूवरील लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह विविध रुग्णालयात निर्मित लसीकरण केंद्रांना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी भेट दिली. यावेळी पूर्वतयारीचा आढावा घेऊन तांत्रिक बाबींची पूर्तता, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण यासह निरनिराळ्या बाबींवर यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.
दरम्यान, कोरोना वरील लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या पूर्व सूचनेने प्रत्यक्ष लसीकरण सुरू करता येईल, इतकी सुसज्जता महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. लसीकरण पूर्व तयारीमध्ये कोणतीही उणीव, कमतरता राहू नये, ह्याची पुन्हा खातरजमा करण्याचे निर्देश काकाणी ह्यांनी आढावा घेताना यंत्रणेला दिले.
मुंबई मनपामार्फत लसीकरण पूर्व तयारी वेगाने करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार ही कार्यवाही सुरु आहे. लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत.
तसेच, कोविड १९ लसीकरणासाठी एस विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा कृती दलाचे अध्यक्ष सुरेश काकाणी ह्यांनी पूर्व तयारीचा आढावा म्हणून प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह लसीकरण केंद्राना देखील भेट दिली. या आढावा दौऱ्यात उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय) डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे सहभागी झाले होते. संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक देखील पाहणी प्रसंगी उपस्थित होते.
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयापासून पाहणी दौरा सुरू झाला. त्यानंतर कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवणूक केंद्रात आढावा घेण्यात आला. कूपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, शीव रुग्णालय, केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावरील तयारीची काकाणी यांनी पाहणी केली.