डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत प्रत्येक वाहन रस्त्यावर उभे असते. यामुळे मोठया प्रमाणात कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी हेात असून शहराची वस्ती वाढत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीमुळे सोनसाखळी खेचणे, मोबाईल चोरी यासारखे गुन्हे वाढत आहेत. वाढती लोकसंख्या व वाहनसंख्या यामुळे कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारी वाढली आहे. यासाठी वाहतूक पोलिंसाच्या मदतीने वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यानी सांगीतले.
डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात पानसरे बोलत होते. कल्याण डोंबिवलीत मोठया संख्येने वाहने असून वाहनतळ नसल्याने प्रत्येक वाहन रस्त्यावर उभे असते. परिणामी वाहतूक कोंडी होते व गुन्हेगार याचा गैरफायदा घेतात. वाहतूक पोलिसांच्या मदतीने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. सध्या पोलिसांचे लक्ष गुन्हेगारी टोळ्यांवर असून त्याना जेरबंद केल्याने 50 गुन्हे उघडकीस आले असून 9 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तुरुंगातून सुटलेले आरोपी पुन्हा गुन्हेगारी करत असल्याने त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामध्ये गुन्हेगारांची यादी करण्यात येत असून 25 ते 40 वयोगटातील नव्या गुन्हेगारांची यादी करण्याचे काम सुरु आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पेालीस ठाण्याचे विभाजन करुन काटई व दावडी अशी दोन पोलीस ठाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. काही विभागात पोलीस चौकीही उभारण्यात येत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पोलीस कार्यालयासाठी शहरात जागा राखून ठेवल्या असून त्याकडे पोलीस प्रशासन लक्ष कधी देणार यावर त्यांनी सांगितले की, हा विषय शासनाच्या अखत्यारीतील असून शासन याबाबत निर्णय घेईल. रेल्वे स्टेशन जवळील स्कायवॉकवर गर्दीचे प्रमाण वाढल्याने तेथे सी.सी.टी.व्ही.ची आवश्यकता आहे. त्यामुळे गुन्हेगार सापडण्यास उपयोग होईल. याप्रसंगी चारही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी, दादासाहेब चौरे, राजेंद्र मुणगेकर आणि पोलीस निरीक्षक नारायण जाधव उपस्थित होते.