रत्नागिरी : उताराचा वापर करूनही वीजनिर्मिती करता येऊ शकते, हे रत्नागिरी जवळच्या मिऱ्य़ा गावातील विनायक बंडबे याने एका प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. त्यासाठी पर्यावरण पूरक या संकल्पनेचा आधार घेण्यात आला आहे. विनायकने रोप ड्रम, गिअर बाँक्स आणि अल्टरनेटरचा वापर करत वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे
वीज निर्मितीसाठी विनायकने विविध यंत्रसामुग्रीची जोडणी केली. बंद स्थितीतील गाडी उतार असल्यास आपोआप पुढे सरकते. याच तत्वाचा वापर विनायकने केला. वीज निर्मिती यंत्रासह रोपड्रम, रोप एक अवजड चारचाकी गाडी यांची निवड केली. ३०० मिटर उताराचा रस्ता निवडला आणि तीन महिन्यांच्या अथक परिश्रमातून विनायकने उतारापासून वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला.
उतारावर चार चाकी गाडीला दोर बांधला जातो. त्याआधी रोपड्रमचा एक रोप गिअर बाँक्सला दिलेला असतो. तर गिअर बाँक्स अल्टरनेटरशी जोडलेला असतो. उतारातून गाडी पुढे गेली कि रोपड्रम फिरतो आणि रोपड्रम गिअर बाँक्स फिरवतो. आणि गिअर बाँक्स अल्टरनेटरला फिरवतो. त्यातून वीज निर्मिती होते.
या वीज निर्मीतीसाठी कुठल्याही इंधनाचा वापर करण्यात आलेला नाही. विनायकच्या कामात मित्र आणि ग्रामस्थ सहभागी होत आहेत. तसेच विविध गावातली मंडळी इंधना शिवाय उताराचा वापर करुन वीज निर्मिती कशी शक्य आहे ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
२५ पैसे प्रतियुनिट खर्च येऊ शकतो
विनायकने वीज निर्मितीची एक प्रतिकृती उभारली आहे. त्यातून सध्या पाच हजार वॅट वीज निर्मिती होवू शकते. त्याचा उपयोग चार घरांना होवू शकतो. सध्या अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी स्पोलिंग रोडची आवश्यकता भासणार आहे. या प्रयोगाचे खरोखरच व्यावसायीक रुपांतर झाल्यास ३५ लाख खर्च येवू शकतो. तयार होणारी वीज केवळ २५ पैसे प्रतियुनिट इतकी असेल असाही दावा विनायकने केला आहे.