मुंबई, विशेष प्रतिनिधी:- राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मातोश्रीवर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 27 मार्च 2019 रोजी उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिने उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कठोर परिश्रम करूनही तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सहकार्य न करण्याचा आरोप करत 10 सप्टेंबर 2019 रोजी काँग्रेसचा हात सोडला. एक वर्ष दोन महिन्यांनंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहे.