मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांना जैन समाजाच्यावतीने ऊर्जापुरूष सन्मान प्रदान करण्यात आला. त्यागाच्या भावनेने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात काम करता येते. त्यागाची भावना ठेवली, तर निसर्गही आपल्याला साथ देतो. त्यादृष्टीने जैन धर्मातील दीक्षाविधीची प्रेरणा घ्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कांदिवली येथील पावनधाम ट्रस्ट येथील आत्मयात्रा दीक्षा महोत्सवात ते बोलत होते.
आरोग्यमंत्री दीपक सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, भाईंदरच्या महापौर गीता जैन, राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज, मनोहरमुनी महाराज, पीयुषमुनी महाराज आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा सोहळा त्यागाची अनुभूती देणारा आहे. गुरूदेव नम्रमुनी महाराज यांच्यामुळे अनेकांच्या जीवनात परिवर्तन आले आहे. त्यांनी अनेकांच्या जीवनात शांती, अहिंसा, त्यागाची भावना प्रज्ज्वलित केली आहे. खरेतर नम्रमुनी महाराजांकडे असीम ऊर्जा आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या या ऊर्जेचा वापर यापुढे समाज कल्याण आणि पवित्र अशा कार्यासाठी केला जाईल. जीवनातील अनेक भौतिक सुखांना त्यागून, दीक्षार्थींनी समाजासाठी मोठे दान दिले आहे.
यावेळी नम्रमुनी महाराज यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी प्रशंसोद्गार काढले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासाची सुत्रे योग्य अशा व्यक्तीच्या हाती सोपवल्याचे नमूद करून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना देश, धर्म आणि समाजाच्या सेवेसाठी काम करण्याची ऊर्जा द्विगुणीत होवोत, अशा सदिच्छा दिल्या.
आरोग्यमंत्री सावंत यांनीही आपल्या भाषणात नम्रमुनी महाराज यांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. यावेळी खासदार शेट्टी, आमदार सागर यांचीही समयोचित भाषणे झाली. नगरसेवक परागभाई शहा तसेच जैन समाजातील धुरिणांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा जैन परंपरेनुसार सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना ऊर्जापुरूष हा सन्मानही प्रदान करण्यात आला. तत्पुर्वी पावनधाम ट्रस्ट येथील कला दालनाचेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.