रत्नागिरी (आरकेजी)- रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिवसेनेला राम राम केला. दरम्यान, मला शिवसेना सोडायची नव्हती मात्र सोडण्यास भाग पाडलं गेल, असा खरमखरीत टोला त्यांनी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष लगावला. सामंत यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार उदय सामंत यांच्यासोबत राजेश सावंत शिवसेनेत आले. उदय सामंत यांचे ते गेली 17 वर्ष खंदे समर्थक आहेत. पण गेले काही दिवस ते नाराज होते. राजेश सावंत हे भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. अशातच त्यांना दोन दिवसांपूर्वी उप जिल्हाप्रमुख पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यातच आज राजेश सावंत यांनी उपनगराध्यक्ष राजीनामा देत जवळच्याच व्यक्तींनी मला शिवसेना सोडायला लावली, असा थेट आरोप केला. माझ्याबद्दल अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात आले. माझी काय चूक झाली हेही मला सांगण्यात आलं नाही. त्यामुळे अशा वातावरणात आपल्याला आता रहायचे नाही. शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्याला चांगली साथ दिली. जुन्या कार्यकर्त्यांबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. मला शिवसेना सोडायची नव्हती, मला शिवसेनेत रहायचं होतं. पण नाईलाजाने मला शिवसेना सोडायला लावली. आणि तेही राजकारणातील जवळच्याच व्यक्तींनी शिवसेना सोडायला भाग पाडलं, असा थेट आरोप त्यांनी कोणाचंही नाव न घेता केला आहे. पण साहजिकच त्यांचा रोख आमदार उदय सामंत यांच्यावरच असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. येत्या 8 दिवसांत आपण आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.