लखनऊ (कोकणवृत्तविशेष) : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अभूतपूर्व यश संपादन केले. येथील ४०३ जागांपैकी तब्बल ३२२ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. स्पष्ट बहुमत या पक्षाला मिळाले आहे. त्यामुळे मोदी यांचीच लाट देशात कायम असल्याचे सिद्ध झाले होऊन भाजपा विरोधकांना फार मोठा तडाखा बसला आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षासह कॉंग्रेस, बसपा हे पक्ष निवडणुकीत सपशेल गारद झाले आहेत. सपाला ४७ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली होती. परंतु, मतदारांनी दोन्ही पक्षांना नाकारलेच नव्हे तर दारुण पराभव म्हणजे काय? हे पाहण्यासारखी स्थिती निर्माण केली. एकेकाळी उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता मिळवणार्या मायावतींच्या बसपाची तर पुरती वाताहात झाली. या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या आहेत.
उत्तर प्रदेशाच्या राजकारणात आता भगवा रंग अधिक गडद झाला आहे. हर हर मोदीचे नारे देऊन मोदींच्या नावाचा जयघोष येथे पुन्हा घुमायला लागला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय भाजपाने येथे संपादन केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात पिंजून काढला आणि विजयासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. कार्यकर्त्यांची व्यवस्थित बसविलेली फळी पक्षाच्या कामी आली. त्यामुळे विरोधकांना नमविणे सोपे गेले. ऐन निवडणुकीच्या काही महीने आधी समाजवादी पक्षात पडलेली फुटदेखील भाजपाच्या पथ्यावर पडली. मायावतींना देखील मोठा पराभव पत्करावा लागला. कार्यकर्त्यांची भरभक्कम फळी निर्माण करणारा हा पक्ष मोदी लाटेत स्वत्व हरवून बसला आहे. या लाटेचा तडाखा इतका होता की पराभवाच्या निराशेतून बहेनजींनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला, असे वक्तव्य केले आहे.
यापुढील काही दिवस उत्तर प्रदेश निवडणुकीवर चर्चा झडतील. जय-पराभवाचे विश्लेषणदेखील होईल. विरोधक मोदी आणि भाजपा यांच्यावर कठोर टीकाही करतील. हे काहीही असले तरी आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यास यशस्वी ठरले, हे मात्र विरोधकांना मान्य करून परिस्थितीला स्वीकारावेच लागेल.