मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेरमवर्क’ (एनआयआरएफ) रॅंकिंग देण्यात येते. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा समावेश व्हावा तसेच विद्यापीठाचे मानांकन अग्रक्रमी असण्यासाठी कुलगुरुंनी मिशन मोडमध्ये काम करावे, असे आदेश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.राज्यपाल यावेळी म्हणाले, विद्यापीठांचे मानांकन अग्रक्रमी ठेवताना यासाठी प्रत्येक विद्यापीठाने अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा. याबरोबरच सर्व कुलगुरुंनी येणाऱ्या काळात परीक्षांचे निकाल वेळेत लावणे, विद्यापीठ- महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यावर लक्ष देणे, कालबद्ध पद्धतीत एकात्मिक विद्यार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करुन कार्यान्वित करणे, शैक्षणिक लेखापरीक्षण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणे आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम आणि कौशल्य शिक्षणावर आधारीत असलेले अभ्यासक्रम विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सुरु केल्यानंतर याबाबतचा प्रगतीदर्शक अहवाल वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे.या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, रुसाच्या प्रकल्प संचालक मीता राजीव लोचन, वैद्यकीय शिक्षणचे सचिव संजय देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, एआयसीटीईचे संचालक अनिल सहस्त्रबुद्धे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरु, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.