रत्नागिरी : सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी दिसून आलेल्या गैरकारभाराबाबत त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, याची माहिती पालकमंत्री रविंद्र वायकर यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इमारतीतील अस्वच्छता, प्रत्येक कामात नियोजनचा अभाव, बंद पडलेले कोर्स यामुळे मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा कारभार ढिसाळ होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राची स्थापना सन् 2005 साली झाली. मात्र, स्थापनेपासूनच हे उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या उपकेंद्रामार्फत सिंधू स्वाध्याय सर्टिफिकेट कोर्स आणि रेल्वे इंजिनियरिंगचे कोर्स सुरू करण्यात आले होते. पण सद्यस्थितीत हे कोर्स बंद आहेत. या उपकेंद्रात ऑन स्क्रीन मार्क्स अंतर्गत पेपर तपासणी केंद्र सुरू होणार होते. त्या संदर्भात या उपकेंद्राला 50 संगणक देखील उपलब्ध झाले होते. मात्र, ते अद्यापही धुळ खात पडून आहेत. ही सेवा अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. विद्यार्थी मदत केंद्राचीही घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्याचीही अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रमही बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांना कॅन्टिन, मैदान, स्वच्छतागृह यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. या केंद्रात दोन स्वच्छता कर्मचारी आहेत. परंतु, वर्गखोल्याची दैनंदिन स्वच्छता केली जात नाही. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आवारात झाडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रयोगशाळेतील बरेचसे साहित्य प्रयोगशाळेबाहेरच आहे. त्यामध्ये अॅसिडच्या बाटल्यांचाही समावेश आहे. जुने सामान तसेच रचून ठेवण्यात आले आहे. या इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, ही यंत्रणा मोडकळीस आली असून, आग लागण्याची घटना घडल्यास याचा किती उपयोग होईल याबाबत शंकाच आहे. या पाहणीवेळी त्यांच्यासोबत तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, देवदत्त पेंडसे, सनी दुधवडकर, प्रथमेश साळवी, आशुतोष तोडणकर, अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते.
माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी हे उपकेंद्र सक्षम होण्यासाठी पावले उचलली होती. त्यांनी सिंधू स्वाध्याय आणि रेल्वे इंजिनिअरिंग कोर्स सुरू केले होते. पण त्यानंतर माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी याचे श्रेय दुसर्याला मिळू नये म्हणून हे कोर्स बंद केले. आता हे कोर्स अहमदाबाद येथे जाणार असल्याचे कळते. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. येथील दुरवस्था पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या निदर्शनास आणून देऊ, असेही यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.