नवी दिल्ली, 16 जुलै : केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी आज कोलकाता येथून बांग्लादेशातील चट्टोग्राम बंदरमार्गे आगरताला येथे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला, आभासी समारंभाने हिरवा झेंडा दाखविला. भारत आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या चट्टोग्राम आणि मोंगला या बांग्लादेशातील बंदरांतून भारताच्या मालवाहू जहाजांचे वहन करण्याच्या करारानुसार, हे कार्य पार पडले.
यावेळी बोलताना मांडवीय म्हणाले, की हा मार्ग सुरू झाल्याने दोन्ही देशांना अनेक संधींचे द्वार खुले होईल. या मार्गामुळे बांग्लादेशातून ईशान्य भागात जाण्यासाठी वैकल्पिक आणि संक्षिप्त मार्ग उपलब्ध झाला आहे. चट्टोग्राम आणि मोंगली या बंदरांचा वापर हे भारताच्या मालवाहतूकीसाठीचे ऐतिहासिक पाऊल आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले. याद्वारे भारत आणि बांग्लादेश यांच्यात नौवहन क्षेत्रासाठी एक नवे दालन खुले झाले आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या चाचणीसाठी पाठविलेल्या मालात दोन टीएमटी (उष्णतावाहक थर दिलेले) स्टील बार टीईयू (20 फुटांपर्यंत) पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात आणि दोन (20फुटांपर्यंत) टीएमटी पल्सेस करीमगंज, आसाम या भागात पाठविण्यात आले आहेत. चट्टोग्राम इथे पोहोचल्यानंतर ते बांग्लादेशी ट्रकने आगरताला येथे पाठविले जातील.
बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या 2019 साली झालेल्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय करार झाला होता व त्यानुसार चट्टोग्राम आणि मोंगली या बांग्लादेशातील बंदरांतून भारतात मालवाहतूक करण्याचा करार झाला होता, त्या मानक कार्यप्रणालीनुसार आता बांग्लादेश आणि ईशान्य भारतात वाहतुकीचे जाळे मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेले प्रयत्न पूर्णत्वाला आले आहेत, हे या चाचणीमुळे अधोरेखित झाले आहे. यामुळे भारत आणि बांग्लादेश यांच्यातील प्रदीर्घ संबंधांचे बळकटीकरण होईल.
यामुळे दोन्ही देशातील वाहतुकीतील अंतर आणि वेळ वाचून दोन्ही देशांना आर्थिक लाभ होईल. बांगलादेशात यामुळे रोजगाराच्या संधी, वाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक, व्यवसायाच्या अधिक संधी निर्माण होऊन महसुलात वाढ होईल. भारतीय मालाची ने-आण करण्यासाठी बांग्लादेशातील जहाजे आणि ट्रक्स वापरले जातील.
अलिकडच्या काळात भारत आणि बांग्लादेश यांच्यातील नौवहन आणि अंतर्गत जलव्यापार क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागले आहे. जलमार्गाने औपचारिक पध्दतीने वाहतूक आणि व्यापार करण्यासाठी सध्या सहा बंदरे खुली झाली आहेत, यात दोन्ही देशांतील आणखी प्रत्येकी पाच बंदरेही अलिकडेच सामिल झाली आहेत. भारताने 80% टक्के तर बांग्लादेशाने उरलेला खर्च करून, बांग्लादेशातील निवडक जलमार्गांच्या विकासासाठी गाळ उपसण्याचे काम करण्यासाठी दोन्ही देशांत झालेल्या एका सामंजस्य करारानुसार सुरू झाले आहे. पर्यटनासाठी आणि लोकांचा एकमेकांशी परीचय वाढविण्यासाठी दोन्ही देशांत समुद्र परीभ्रमण सेवेचीही (क्रुझ सर्व्हिस) सुरुवात झाली आहे.