मुंबई. 22 मे : प्रसिद्ध कामगार नेते पुरुषोत्तम सामंत तथा दादा सामंत यांचे वृद्धापकाळाने आज 91 व्या वर्षी निधन झाले. बोरिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते दत्ता सामंत यांचे ते थोरले बंधू होते. अभ्यासू कामगार नेता हरपला, अशी प्रतिक्रिया कामगार चळवळीतून व्यक्त होत आहे.
दत्ता सामंत यांची हत्या झाल्यानंतर कामगार आघाडीची धुरा दादा सामंत यांनी समर्थपणे पेलली. अखेरपर्यंत ते कामगार चळवळीत कार्यरत होते. वृद्धापकाळातही ते कामगार संघटनेच्या विविध न्याय प्रकरणात कामगार न्यायालयातही उपस्थिती दर्शवत होते.
1997 ते 2011 पर्यंत ते कामगार आघाडीचे अध्यक्ष होते. 1981 च्या गिरणी कामगार संपानंतर चांगली नोकरी सोडून त्यांनी कामगार चळवळीत स्वतःला झोकून दिले. कामगार कायद्याबाबत त्यांचा अभ्यास दांडगा होता. सिध्दार्थ महाविद्यालयातून बी.एस्सी. झाल्यावर त्यांनी १९५३ ते
१९६० पर्यंत पश्चिम रेल्वेत नोकरी केली. त्यावेळी ‘वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन’चे मुंबई विभागीय सचिव होते. १९६० मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व केल्यामुळं त्यांना बडतर्फ व्हावं लागलं. त्यानंतरही एक ते दीड वर्ष त्याच संघटनेचं विनावेतन पूर्णवेळ काम केलं. नंतर मुंबईतील ‘दिग्विजय मिल’मध्ये सुपरवायझरची नोकरी स्वीकारली. सुमारे २१ वर्षे अनेक गिरण्यांत मोठ्या हुद्यांवर नोकऱ्या केल्या.
विविध कामगार संघटनांनी दादा सामंत यांना आदरांजली वाहिली आहे. दादा सामंत यांचा गिरणी कामगार लढ्यात मोठा सहभाग होता. डॉ दत्ता सामंत यांच्या निधनानंतर त्यांनी घाटकोपर येथील युनियनची बरीच जबाबदारी सांभाळली होती. अनेक उद्योगात त्यांनी युनियनच्या वतीने कामगारांचे वेतन करार केले. महाराष्ट्र कामगार संघटना कृती समितीमध्ये काही काळ ते कार्यरत होते. कामगार चळवळीतील एक ज्येष्ठ व कामगार कायद्यावरील अभ्यासू कामगार नेता हरपला, अशी भावना व्यक्त करून मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी गोदी कामगारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गिरणी कामगार व इतर कामगारवर्गासाठी मैदानात व न्यायालयात सतत अभ्यासपूर्ण संघर्ष करणारे नेते दादा सामंत यांना विनम्र श्रध्दांजली, अशी प्रतिक्रिया भाकपचे कॉ.प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे.
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद लांडगे म्हणतात की, “आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कामगारनेते डॉ. दत्त सामंत यांचे मोठे बंधू आणि विख्यात कामगारनेते पुरुषोत्तम उर्फ दादा सामंत यांचे आज सकाळी ९१ व्या वर्षी वार्धक्याने बोरिवली येथे दुःखद निधन झाले. दादांचा आणि माझा संबंध गेल्या जवळपास 25 ते 30 वर्षांचा. गेल्याच महिन्यात त्यांचा मला फोन आला होता. त्यात लॉक डाऊननंतर भेटायचे ठरले होते. मात्र नियतीला हे मान्य नसावे. दादा सहजपणे कधी कधी स्वतःच फोन करून ख्यालीखुशाली विचारत असत. इतका त्यांचा मनाचा मोठेपणा होता. या आमच्या मैत्रीतूनच साधारणपणे मी ‘वृत्तमानस’ दैनिकात काम करत असताना २००० ते २००१ या २ वर्षात त्यांना ‘वृत्तमानस’ मध्ये कामगार चळवळीवर लेखन करण्याची विनंती केली. त्यांनीही आनंदाने होकार देण्याआधीच काही लेख दुसऱ्याच दिवशी पाठवून दिले. त्यावेळी त्यांनी शेकडो लेख लिहिले. त्यातील काही निवडक ४४ लेखांचे मी प्रकाशक म्हणून २०० पानांचे पुस्तक प्रकाशित केले. ‘मानस श्रमिकांचे’ या नावाने आलेल्या या पुस्तकासाठी विख्यात कामगारनेते आणि मुंबईचे माजी महापौर तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. शांती पटेल यांनी सुंदर अशी प्रस्थावना लिहली होती. त्यावेळी या पुस्तकाचे वाचकांनी आणि खास करून महाराष्ट्रातील कामगार वर्गाने प्रचंड स्वागत केलं होतं. १ मे २००३ रोजी कामगार दिनाच्या निमित्ताने हे पुस्तक दादांनी आणि मी मुंबई मराठी पत्रकार संघात प्रकाशित केले होते. प्रसारमाध्यमांनी या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याला चांगली प्रसिद्धी दिली होती.
वास्तविक मला दादांवर एक पुस्तक निर्माण करायचे होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्याच महिन्यात योगायोगाने दादांचा फोन आला तेव्हा लॉक डाऊन नंतर भेटण्याचे ठरलेही होते. मात्र नियतीने त्यांच्यावर पुस्तक निर्माण करण्याची संधी काही दिली नाही. दादा सामंत यांना माझी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपुर्ण अदरांजली !!”