मुंबई : दक्षिण मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयासमोरील (GPO) ‘मिंट’ मार्गावर असणा-या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मुख्यालय व टांकसाळीच्या (Mint) जवळ असणा-या ‘रतनसी मुलजी जेठा फाऊंटन’ला पुन्हा सुस्थितीत आणण्याच्या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनेस्को’द्वारे नुकतीच घेण्यात आली आहे. सन १८९४ मध्ये बांधण्यात आलेले हे कारंजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ (Public Private Partnership) तत्वांतर्गत ‘काळा घोडा असोसिएशन’च्या सहकार्याने आता पुन्हा सुस्थितीत आणले आहे. याच ‘फाऊंटन रिस्टोरेशन’ प्रकल्पाची विशेष नोंद ‘युनेस्को’द्वारे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘एशिया पॅसिफिक’ पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त(सुधार) चंद्रशेखर चोरे यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘ए’ विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ‘रतनसी मुलजी जेठा फाऊंटन’ आहे. सन १८९४ मध्ये’इंडो-सेरेसेनिक’ या स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आलेले हे कारंजे बृहन्मुंबई महापालिकेच्या वारसा जतन यादीमध्ये ‘दर्जा – १’चे वारसास्थळ आहे. सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या असणा-या या फाऊंटनला पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्याची गरज गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेने ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ तत्वावर ‘काळाघोडा असोसिएशन’यांच्या सहकार्याने वारसा जतन या विषयात कार्य करणारे ‘वास्तु विशारद’ (Conservation Architect) श्री. विकास दिलावरी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आला आहे. सदर फाऊंटन पुन्हा सुस्थितीत आणण्याचा हा प्रकल्प पूर्ण केला आहे. वर्ष २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीदरम्यान हा प्रकल्प यशस्वीप्रकारे पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात आलेल्या असल्याने ‘काळाघोडा असोसिएशन’ यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक तो खर्च केला आहे.
हे कारंजे सध्या रोज सकाळी ९ ते १० या दरम्यान, तर रोज संध्याकाळी सुर्यास्तापूर्वी व सुर्यास्तानंतर प्रत्येकी ३० मिनीटे;यानुसार दररोज २ तास सुरु असते. तसेच सध्या या कारंज्याचे दैनंदिन परिरक्षण हे ‘काळा घोडा असोसिएशन’ द्वारेच केले जात आहे, अशीही माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाद्वारे देण्यात आली आहे.