
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एका उमेदवाराने आपला वचननामा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जाहीर केला आहे. समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे संजय गांगनाईक यांनी हा आपला वचननामा बॉण्डवर जाहीर केला आहे. शपथपत्रावर वचननामा देण्याची या मरदारसंघातली ही पहिलीच घटना आहे. आज पत्रकार परिषदेत गांगनाईक यांनीच ही माहिती देत बॉण्डपेपरवरील आपला वचननामा दाखविला.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील समाजवादी फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक हे सध्या वचननामा शंभर रुपयांच्या बॉण्डपेपरवर जाहीर केल्याने चर्चेत आले आहेत. गांगनाईक हे मूळचे सिंधुदुर्गातील असून कोकणात अस्तंगत होत चाललेल्या समाजवादी विचाराला पुन्हा चेतवण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं त्यांनी जाहीर केलय. राजकारण्यांच्या आश्वासनावर जनतेचा विश्वासच उरला नसल्यामुळे शपथपत्रावर वचननामा द्यावा लागत असल्याच गांगनाईक यांचं म्हणणं आहे.
अनेक राष्ट्रीय पक्ष नेहमीच वचननामा किंवा जाहिरनामे काढतात. मतदाराला आकर्षित कऱण्यासाठी हे राष्ट्रीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातून अनेक आश्वासने देत असतात. पण गांगनाईक यांनी जाहिर केलेला वचननामा काही हटके आहे. पेशाने वकिल असलेल्या संजय गांगनाईक यांनी चक्क शंभर रुपयांच्या शपथपत्रावर म्हणजे बाॅण्ड पेपरवर वचननामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे.
*दिवस रात्र जनतेच्या प्रश्नांसाठी काम करेन
*स्वार्थांसाठी विशेष सवलत उपभोगणार नाही
*प्रत्येक महिन्यात एकदा तरी मतदार संघातील एका तालुक्याला भेट देईन
*केंद्रात येईल त्या सत्ताधारी पक्षाला विनाअट पाठिंबा देईन
*संसदनिधीच्या वापराचा हिशोब वेळोवेळी जनतेसाठी प्रसिद्ध करेन
*पर्यावरणाचे संतुलन राखणारे उद्योग-धंदे आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन
आदी 10 मुद्दे गांगनाईक यांनी आपल्या शपथपत्रावरील वचननाम्यात जाहीर केले आहेत















