मुंबई : आपल्या घणाणाती भाषणांनी, विचारांनी ७०-८० च्या दशकात राज्याचे समाजकारण, राजकारण, साहित्यविश्व ढवळून काढणारे दलित पँथरच्या संस्थापकांपैकी एक राजा ढाले यांचे आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे. ढाले यांनी जातीयवादी व्यवस्थेविरोधात तीव्र लढा दिला. जेथे जेथे दलितांवर अन्याय होत, तेथे जाऊन जाब विचारण्याची हिंमत त्यांनी त्या काळी दलित तरुणांमध्ये निर्माण केली होती.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी 17 जुलैला दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होईल. दादर चैत्यभूमीच्या बाजूला असणाऱ्या इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अशी माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया :
आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री
दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता,प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळींचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे.
आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ;मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्णश्रद्धांजली अर्पण केली आ
बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा नायक : अविनाश महातेकर
राजा ढाले यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे धक्का बसला आहे. त्यांचे वयोमान झाले होते, तरीही त्यांना कुठलिही व्याधी नव्हती. एकाएकीच त्यांनी आपला प्रवास संपवला. बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा असा नायक होता. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा ढाले हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
राजा ढाले चांगले कवी, वाचक, संपादक, लेखक होते. त्यांची स्मृती शेवटपर्यंत टीकून होती. पुस्तकाचा त्यांचा मोठा संग्रह होता. तर्कशास्त्रावर त्यांची मोठी पकड होती. एखाद्या गोष्टीचा तर्कवाद करताना समोरच्याला ते निष्प्रभ करत. त्यांच्या तावडीतून भलेभले साहित्यिक सुटले नाहीत.
राजा ढाले यांनी दलित चळवळीला बौद्धीक पातळीवरच्या संघर्षाची प्रेरणा दिली. लोकांच्या प्रश्नावर लढाई करणारा हा माणुस होता. दलित पँथर किंवा त्यांनी स्थापन केलेल्या मास मुव्हमेंट संघटनांचा पुढे कित्येक वर्ष कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव राहिला. या पार्श्वभूमीवर राजा ढाले यांचे अकाली जाणे चटका लावणारे आहे, असेही महातेकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक नेता काळाच्या पडद्याआड : सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
लेखक, विचारवंत आणि ज्येष्ठ नेते राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते व एक मार्गदर्शक नेते काळाच्या पडद्याआड गेले. दलित पॅंथरच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. श्री. ढाले यांच्या निधनाने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व,आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.