
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : गणपती बाप्पाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले असून घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशेात्सव मंडळात स्वागताची लगबग सुरु झाली आहे. बाप्पांचे आवडते म्हणून उकडीच्या मोदकांना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असते. ते बनविण्यासाठी नारळ, गुळ या पदार्थांचा उपयोग होतो. या पदार्थांसह मजुरी वाहतूक यांचे दर वाढल्याने गेल्या वर्षापेक्षा यंदा उकडीच्या मोदकांचे दर 2 ते 4 रुपयांनी महागणार आहेत. मात्र असे असले तरी शहरात सुमारे पाऊण लाख उकडीचे मोदक विकले जातील, असा विश्वास विक्रेते व्यक्त करीत आहेत.
डोंबिवलीत सुमारे 150 पेक्षा जास्त भाजी-पेाळी केंद्रे असून या केंद्रांवर आताच उकडीच्या मेादकांच्या मागणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. डोंबिवलीत महिला मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी घराबाहेर असतात त्यामुळे भाजी पोळीसह उकडीच्या मोदकांना चांगलीत मागणी असते. याबाबत भाजी पोळी केंद्राचे प्रणेते संजय कानिटकर म्हणाले, प्रत्येक जण उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. कारण नक्की किती मोदक लागतील त्याचा अंदाज येतो आमच्या तीनही भाजी पोळी केंद्रांवर साधारणपणे 15 रुपये दर असतील मात्र इतर ठिकाणी हे दर जास्त असतील असेही ते म्हणाले तर कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, मजूरी मोठया प्रमाणावर वाढली असून मोदक तयार करण्यासाठी महिला मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे साधारणपणे मोदकांचे दर 18 ते 24 रुपये असणार आहेत. गेल्यावर्षापेक्षा हे दर 2 ते 4 रुपयांनी जास्त असल्याचे त्यानी मान्य केले व इलाज नाही असेही ते म्हणाले. श्रीपाद कुलकर्णी पुढे म्हणाले, उकडिचेच नाही तर इतर सर्व प्रकारच्या मोदकांमध्ये दरवाढ झाली आहे. तळलेले मोदक 20 रुपये नग असा आहे तर आंबा मोदक 600 रुपये किलो, मावा 500 रुपये किलेा, कंदी 400 रुपये तर ड्रायफ्रुट 880 रुपये किलेा असा असणार आहे.