मुंबई : प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते दुबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती डॉ धनंजय दातार यांच्या‘मसालाकिंग… आठवणींचा प्रवास’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी होत आहे. गिरगाव येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार तसेच उद्योग व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दातार आज जगप्रसिद्ध झाले आहेत तरीही ते आपल्या शाळेतल्या शिक्षकांना विसरले नाहीत. या प्रकाशन सोहळ्यासाठी अमरावतीहून मुंबईला येण्याची त्यांची खास सोय दातार यांनी केली आहे. यावेळी ‘धनंजय दातार बिझनेस टायकून ऑफ द इयर अॅवॉर्ड्स’चे वितरणही होणार आहे.
‘मसालाकिंग… आठवणींचा प्रवास’ ही दुबईस्थित एका मराठी उद्योजकाची प्रेरणादायी अशी संघर्षमय यशोगाथा आहे. डॉ.दातार यांच्या महाराष्ट्र ते दुबई या यशस्वी औद्योगिक प्रवासाची गाथा या पुस्तकातून उलगडणार आहे. प्रकाशन सोहळ्यानिमित्त दातार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे. त्याशिवाय पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन तसेच गाणी आणि अरेबिक व महाराष्ट्रातील नृत्याचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे.
कार्यक्रमामध्ये सचिन खेडेकर, ‘नटरंग’फेम सोनाली कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, प्रसाद ओक, मयूर वैद्य आणि उत्तरा मोने हे मान्यवर सहभागी होत आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक संजय मोने हे या कार्यक्रमाचे संहिता लेखन करत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन मिती क्रिएशन्सचे आहे. सोहळ्याला प्रवेश निमंत्रितांसाठी आहे.
आपल्या मातीचे ऋण मानून या मातीतील म्हणजे महाराष्ट्रातील यशस्वी होतकरू आणि अनुभवी उद्योजकांचा गौरव करण्याचे डॉ दातार यांनी नुकतेच जाहीर केले होते. या उद्योजकांचा गौरव या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी ‘बिझनेस टायकून ऑफ द इयर अॅवॉर्ड्स’ देऊन करण्यात येणार आहे.
एका छोट्या किराण मालाच्या दुकानापासून सुरुवात करत आज एक भव्य सुपरमार्केट साखळी संपूर्ण आखाती देशांमध्ये उभारण्याचे श्रेय डॉ दातार यांना जाते. ‘अल अदिल ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ धनंजय दातार यांनी संपूर्ण आखाती देशांत आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एक साम्राज्याचं उभं केलं आहे. त्यांना तिथे आता ‘मसाला किंग’ या नावाने ओळखले जाते.
डॉ दातार हे वयाच्या केवळ २०व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी नव्याने थाटलेल्या किराणा दुकानात त्यांना मदत करण्यासाठी आणि हातभार लावण्यासाठी म्हणून दुबईला गेले. त्यांनी केवळ पाचच वर्षात या व्यवसायाची सूत्रे आपल्या हातात घेतली. विविध भारतीय समाजांना हव्या असलेल्या चीजवस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच त्यांनी रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलना या वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक भव्य अशी फॅक्टरी उभारली. त्यानंतर शारजाह आणि अबू धाबीमध्ये त्यांनी नवीन स्टोर्सची सुरुवात केली. आज ‘अल अदिल ग्रुप’ संपूर्ण अरब अमिरातींमध्ये ४० सुपरमार्केट चालवतो. त्याशिवाय या समूहाच्या मालकीच्या १९ पिठाच्या मिल्स आहेत आणि दोन फॅक्टरी आहेत. शारजाह आणि दुबईमध्ये हा समूह चार नवीन सुपरमार्केट उघडणार आहे.